For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साडेचार किलोमीटरचा फ्लायओव्हर बनणार

06:59 AM Jan 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
साडेचार किलोमीटरचा  फ्लायओव्हर बनणार
Advertisement

राष्ट्रीय महामार्ग ते कित्तूर चन्नम्मा चौकापर्यंत होणार बांधणी

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गापासून कित्तूर चन्नम्मा चौकापर्यंत साडेचार किलोमीटर लांबीच्या फ्लायओव्हरच्या योजनेला चालना मिळाली आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

Advertisement

फ्लायओव्हर योजनेसंबंधी शनिवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या समन्वय बैठकीत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचा खूप वर्षांपासूनचे स्वप्न साकार करण्यासाठी फ्लायओव्हर निर्मितीला चालना देण्यात येत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्गापासून किल्ला येथील सम्राट अशोक चौक, आरटीओ सर्कल व कित्तूर चन्नम्मा सर्कलपर्यंतची वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे. नूतन सुपरस्पेशालिटी इस्पितळ व जिल्हाधिकारी कार्यालय संकुलासाठी अनुकूल ठरेल अशा पद्धतीने फ्लायओव्हरची रचना करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.

असा असेल फ्लायओव्हर

राष्ट्रीय महामार्गापासून संकम हॉटेल, सम्राट अशोक चौक, आरटीओ सर्कल मार्गे कित्तूर चन्नम्मा सर्कलपर्यंत फ्लायओव्हर उभारण्यात येणार आहे. सम्राट अशोक चौक येथे एक रॅम्प बसथांबा, आरटीओ चौक व महांतेशनगरकडे जाण्यासाठी रॅम्प असणार आहे. आरटीओ सर्कल परिसरात तीन रॅम्प असणार आहेत. राणी चन्नम्मा चौक, कोल्हापूर सर्कल व मध्यवर्ती बसस्थानकाशी संपर्क व्यवस्था करण्यात येणार आहे.

सांबरा विमानतळाकडे जाण्यासाठी सर्व्हिस रोड

एका ओव्हरब्रिजच्या माध्यमातून सांबरा विमानतळाकडे जाण्यासाठी सर्व्हिस रोडचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. कित्तूर चन्नम्मा चौक मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे या चौकात मोठी कमान असणार आहे. बीएसएनएल, हेस्कॉम, परिवहन मंडळ, पाणीपुरवठा विभागासह वेगवेगळ्या खात्यांनी या योजनेसाठी आवश्यक तयारी करावी. या परिसरातील वेगवेगळ्या खात्यांनी पर्यायी व्यवस्था करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.

या बैठकीत पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंते राजेंद्र, सार्वजनिक बांधकाम खात्याचे एस. एस. सोबरद, प्रांताधिकारी श्रवण नायक, भूसंपादन विभागाचे बलराम चव्हाण आदींसह बीएसएनएल, हेस्कॉम, परिवहन, पाणीपुरवठा, स्मार्टसिटी आदी विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.