जमिनीवरही जिवंत राहू शकणारा मासा
स्वत:ला दगडासारखा टणक करण्याची किमया
मासे हे पाण्यात असतात, पाण्याबाहेर त्यांना काढल्यास त्यांचा मृत्यू होत असतो. परंतु एक मासा पाणीच नव्हे तर जमिनीवरही जिवंत राहू शकतो. हा मासा स्वत:ला ‘दगडा’त रुपांतरित करत असतो. लंगफिशला सलामांडर फिश म्हणूनही ओळखले जाते. हा मासा पाण्यासोबत जमिनीवरही राहण्यासाठी ओळखला जातो.
हा मासा अनेक महिन्यांपयंत पाण्याशिवाय राहू शकतो. अनेकदा तर वर्षापर्यंत तो पाण्याशिवाय तग धरु शकतो. या माशाची रेस्पिरेटरी सिस्टीम अत्यंत अनोखी आणि खास असते. हा मासा थेट हवेतून ऑक्सिजन प्राप्त करू शकतो. लंगफिश जसजसे मोठे होत जातात, ते हवेतून ऑक्सिजन प्राप्त करू लागतात. तर गिल्सद्वारे ऑक्सिजन खेचणे बंद करतात. पाण्यात राहूनही त्यांना पुन्हा पुन्हा पृष्ठभागावर यावे लागते, तेथून ते ऑक्सिजन प्राप्त करतात. अशा स्थितीत हा मासा पाण्यात अधिक वेळ राहिल्यास बुडू देखील शकतो. याचे शरीर ईलप्रमाणे लांब असते.
या माशाच्या आसपास पाणी असल्यास तो अन्य माशांप्रमाणेच हालचाली करतो परंतु पाण्याबाहेर असल्यावर हा मासा मातीमध्ये स्वत:ला गाडून घेतो. तोंडात तो माती गिळत असतो. जेव्हा एका निश्चित खोलीपर्यंत पोहोचल्यावर हा मासा स्वत:च्या त्वचेतून म्यूकससारखा पदार्थ उत्सर्जित करतो, जो त्याच्या शरीराच्या बाहेरील हिस्स्याला पूर्णपणे झाकून टाकतो आणि त्याला टणक स्वरुप प्राप्त करून देतो. केवळ त्याचे मुख खुले राहते, ज्याद्वारे तो श्वसन करतो. हा मासा आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या काही हिस्स्यांमध्ये आढळून येतो.