चिपळुणात किराणा दुकानाला आग
अलोरे येथील घटना, लाखो रूपयांचे नुकसान
चिपळूण
तालुक्यातील अलोरे येथील देवरे मार्केट येथे किराणा दुकानाला आग लागल्याची घटना बुधवारी पहाटे 5.25 च्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. आगीत दुकानातील सुमारे 6 लाखाहून अधिक रूपयांचे साहित्य भस्मसात झाले.
नेमक्या कोणत्या कारणामुळे ही आग लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हनुमंत चव्हाण यांच्या मालकीचे हे दुकान आहे. किराणा दुकानाला आग लागल्याची घटना चव्हाण यांना समजल्यानंतर त्यानुसार त्याच्यासह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला असला तरी तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. अखेर या घटनेची माहिती तत्काळ अग्निशामन विभाग पोफळी, महानिर्मिती यांना देण्यात आली. त्यानुसार येथील कनिष्ठ अग्निशमन अधिकारी जे. के. यादव, वाहनचालक एस. आर. चव्हाण, व्ही. ए. पाटील, आर. पी. पाटील, व्ही. जे. चव्हाण, आर. जी. मातकर आदी घटनास्थळी गेल्यानंतर बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. आगीत दुकानातील सर्वच साहित्य भस्मसात झाले आहे. यातून चव्हाण यांचे सुमारे 6 लाखाहून अधिक रूपयांचे नुकसान झाले.