कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘यारें का यार धरमेंदर’ला अखेरचा सलाम...

06:05 AM Nov 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘फिल्म फेअर’ पुरस्कार मिळवणे हे एक स्वप्न असण्याच्या काळात हा पुरस्कार ‘ही मॅन’ धर्मेंद्रला वारंवार हुलकावणी देत राहिला. या सन्मानाच्या पुरस्कारासाठी त्याचे तब्बल सहावेळा नामांकन झाले. ही खंत मनात असतानाच त्याला फिल्म फेअरने हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याच्या अमूल्य योगदानाबद्दल 1997 साली ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन गौरविले. या अपूर्व सोहळ्यासाठी मग धर्मेंद्रने आपले दैवत असलेल्या दिलीपकुमार, सायरा बानू आणि मनोजकुमारला पुरस्कार स्वीकारताना रंगमंचावर बोलावले आणि तो चक्क दिलीपकुमारच्या मिठीत जाऊन एखाद्या निरागस बालकाप्रमाणे रडला. पडद्यावरच्या ‘ही मॅन’ची ही पडद्यामागची ओळख. याच कार्यक्रमात दिलीपने आपले मनोगत व्यक्त करताना देवाने आपल्याला धर्मेंद्रसारखे देखणे रूप आणि तगडेपण का दिले नाही, अशी खंत व्यक्त केली होती. धर्मेंद्र आज हयात नाही यावर सिनेरसिकांचा विश्वास बसणे तसे कठीणच.

Advertisement

सुमारे 60 वर्षांच्या कारकिर्दीत तीनशेहून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या धर्मेंद्रला अर्जुन हिंगोरानी यांनी आपल्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ (1960) द्वारे चित्रपटसृष्टीत आणले. ‘यारों का यार धरमेंदर’ अशी कीर्ती असलेल्या धर्मेंद्रने अर्जुन हिंगोरानीशी शेवटपर्यंत दोस्ती निभावली. 1960 ते 1975 पर्यंतच्या कारकिर्दीत त्याने कृष्णधवल आणि रंगीत चित्रपटात ‘रोमँन्टिक हिरो’ म्हणून नाव कमावले. पण नंतर मात्र तो   ‘अॅक्शन हिरो’ म्हणून गाजत राहिला. नूतन, माला सिन्हा, मीनाकुमारी, सायरा बानू, बबिता यांच्याबरोबर प्रारंभीचे त्याचे चित्रपट गाजल्यानंतर स्वप्नसुंदरी हेमा मालिनीशी त्याची जोडी जमली. त्यांचे एकूण 28 चित्रपट आले. त्यातील बहुसंख्य गाजले. जसे त्यांचे चित्रपट पडद्यावर गाजले तशीच त्यांची ‘जगावेगळी’ प्रेम कहाणी पडद्यामागे गाजली. जगावेगळी अशासाठी की, धर्मेंद्र हा त्यावेळी विवाहित आणि चार मुलांचा बाप होता तर हेमा मालिनीवर संजीवकुमार आणि जितेंद्रचे एकतर्फी प्रेम होते. आईवडिलांच्या कडक शिस्तीखाली वाढलेल्या हेमाची ही ‘लव्ह स्टोरी’ दोन्ही घराण्यात त्यावेळी ‘धूम’ माजवून गेली होती. संजीवकुमार आणि जितेंद्रचे प्रस्ताव बारगळल्यानंतर हेमाच्या आईने तिच्यासाठी गिरीश कार्नाड आणि धीरजकुमारचे प्रस्ताव तिच्यासमोर ठेवले. पण हेमाने ते फेटाळून लावले. धर्मेंद्रबरोबरच्या तिच्या लग्नाला हेमाच्या वडिलांनी तीव्र विरोध केला. शेवटी त्यांच्या एका अजब घटनेने झालेल्या निधनानंतर दोन वर्षांनी हेमा आणि धर्मेंद्रचा 2 मे 1980 रोजी विवाह झाला. या लग्नासाठी धर्मेंद्रने मुस्लीम धर्म स्वीकारला असल्याच्या बातम्याही त्यावेळी पसरल्या होत्या. पण आपले प्रेमप्रकरण सविस्तरपणे लिहिणाऱ्या हेमाने आपल्या आत्मचरित्रात मात्र असा काही उल्लेख केलेला नाही.

Advertisement

‘पंजाब दा पुत्तर’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या धर्मेंद्रचा जन्म पंजाबच्या कपूरथळा जिल्ह्यातील केवलकिशोर देओल या हेडमास्तरच्या घरी झाला. घरचा विरोध डावलूनच तो चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या इराद्याने मुंबईत आला. तेथे त्याने अपार मेहनतीनंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळवला आणि काही वर्षानंतर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी प्रकाशकौर या मुलीशी त्याचे लग्न झाले. ‘शोले’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सेटवर धर्मेंद्र आणि हेमा यांच्यातील प्रेम बहरले, असे सांगितले जाते. त्यांच्या प्रेमाला अमिताभ बच्चनची मोठी मदत झाली. ‘शोले’ चित्रपटात हेमा मालिनी आंबा पाडण्यासाठी रिव्हॉल्वर चालवते तो शॉट लवकर ओ के होऊ नये यासाठी धर्मेंद्रने प्रत्येक वेळी वीस रु. याप्रमाणे तब्बल दोन हजार रु. खर्च केले होते.

धर्मेंद्रच्या मनाविरुद्ध चित्रपटसृष्टीत

चित्रपटसृष्टी ही मुलांसाठी धोकादायक असल्यामुळे आपल्या मुलींनी येथे येऊ नये असा कडक दंडक त्याने घातल्यामुळे त्याच्या पहिल्या पत्नीपासूनच्या विजेता आणि अजिता या मुली चित्रपटसृष्टीत आल्या नाहीत. तर हेमा मालिनीच्या इशा आणि आहनापैकी  इशा मात्र धर्मेंद्रच्या मनाविरुद्ध चित्रपटसृष्टीत आली खरी पण येथे तिचे बस्तान मात्र बसू शकले नाही. या दोन्ही मुली आणि हेमा मालिनी शास्त्रीय नृत्याचे अनेक कार्यक्रम करतात. धर्मेंद्रने आपल्या सनी आणि बॉबी या मुलांसाठी स्वत: चित्रपट निर्माता बनून त्यांना चित्रपटसृष्टीत आणले.

धर्मेंद्रचे नाव मीनाकुमारीशीही जोडले गेले. तिच्या मृत्यूनंतर तो काहीसा एकाकी झाला. पण हेमामुळे तो पुन्हा सावरला आणि त्याची घोडदौड कायम राहिली. चित्रपटातील लोकप्रियतेच्या जोरावर धर्मेंद्र भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभेवर निवडून गेला. राजस्थानमधील बिकानेर लोकसभा मतदारसंघाचा तो खासदार होता पण राजकारणात त्याचे मन रमले नाही. नवरा-बायको एकाच पक्षाचे खासदार असण्याचे धर्मेंद्र-हेमा हे एक दुर्मीळ उदाहरण मानावे लागेल.

उडत्या चालीची गाणी लोकप्रिय

हिंदी चित्रपटसृष्टीत पुरुषाला नाचता येणे ही त्याची ‘अॅडिशनल क्वॉलिफिकेशन’ मानली जाण्याच्या काळात धर्मेंद्रचा उदय झाला. पण त्याला अजिबात नाचता येत नसूनदेखील उडत्या चालीची अनेक गाणी त्याने लोकप्रिय केली. अर्थात हे श्रेय संगीतकारांचे आणि त्याला प्रामुख्याने आवाज देणाऱ्या महमद रफी आणि किशोरकुमार यांचे असायचे. त्याच्याकडून पडद्यावर नृत्य करवून घेणाऱ्या नृत्य दिग्दर्शकाला सलाम करावाच लागेल. (‘प्रतिज्ञा’ सिनेमातील ‘यमला पगला दीवाना’हे गाणे आठवा) त्याला अनेक हिट गाणी मिळाली. एकाच वर्षात सर्वाधिक  हिट चित्रपट देण्यात धर्मेंद्रचा नंबर बराच वरच लागतो. त्याच्याबरोबर नायिका म्हणून चमकलेल्या श्रीदेवी, जयाप्रदा, डिंपल कपाडिया, अमृतासिंग आणि किमी काटकर यांनी पुढे त्याचा मुलगा सनी देओलच्या नायिका म्हणूनही काम केले. हाही एक दुर्मीळ योगायोगच.

आरोग्याच्या तक्रारी सुरू

नायकाच्या भूमिका करण्याचे वय संपल्यावर त्याने वडील, काका, मामा, आजोबा अशा भूमिकाही केल्या. त्याला मानाच्या ‘पद्मभूषण’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. सिनेमापासून दूर झाल्यानंतर अलीकडची काही वर्षे धर्मेंद्र आपल्या फार्म हाऊसवर रमायचा. 2015 नंतर मात्र त्याच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या आणि त्याला अनेकदा हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले. दोन बायका, दोन मुले आणि चार मुली अशा दोन्ही डगरीवर त्याचे आयुष्य आनंदाने चालले होते. आपल्याला 60 वर्षाहून अधिक काळ आपले ‘हँडसम’ दर्शन देणाऱ्या या पंजाब दा पुत्तरला अखेरचा सलाम.......

- बालमुकुंद पतकी

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article