सिल्क्यारा भुयार दुर्घटनेवर येतोय चित्रपट
बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या नव्या कहाण्यांवर काम करत आहे. याचदरम्यान आमिर खान प्रॉडक्शन्स, माइंड ब्लोइंग फिल्म्स आणि कबीर खान फिल्म्स यांनी एकत्रितपणे एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘सिल्क्यारा 41“ ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट उत्तराखंडच्या सिल्क्यारा भुयार बचाव अभियान आणि या अभियानात सामील आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध टनलिंग एक्सपर्ट तसेच ऑस्ट्रेलियाचे स्थानिक हीरो अर्नोल्ड डिक्स यांच्या कहाणीने प्रेरित असणार आहे.
चित्रपटाची कहाणी ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पटकथालेखक एंड्य्रू अनास्टासियोस (द वॉटर डिवाइनर) यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहे. चित्रपटाची कहाणी उत्तराखंडच्या सिल्क्यारा भुयारात झालेल्या बचाव अभियानावर आधारित असेल. या खास अभियानाचे नेतृत्व टनलिंग एक्सपर्ट अर्नोल्ड डिक्सने केले होते आणि त्यांच्यामुळे अनेक लोकांचा जीव वाचू शकला होता. 2023 मध्ये झालेल्या सिल्क्यारा भुयार दुर्घटनेत अडकून पडलेल्या 41 मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अनेक यंत्रणांनी 17 दिवसांपर्यंत जोरदार पावले उचलली होती. रेट मायनर्सपासून मोठ्या यंत्रसामग्रींचा वापर करण्यात आला आणि मग या मजुरांना 17 दिवसांनी सुरक्षितपणे बाहेर काढता आले होते. हा चित्रपट भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान एका खास सहकार्याचे उदाहरण असेल. परंतु चित्रपटात कोण मुख्य भूमिका साकारणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.