‘तृणमूल’च्या दोन खासदारांमध्ये जुंपली
पक्षांतर्गत भांडणे चव्हाट्यावर, ममता बॅनर्जी नाराज
वृत्तसंस्था / कोलकाता
तृणमूल काँग्रेसच्या दोन खासदारांच्या वादावादीचा व्हिडीओ प्रसारित झाल्यामुळे त्या पक्षातील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी आयोगाच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळचा हा व्हिडीओ असल्याचे दिसून येत आहे. त्यावेळी या पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचे त्यांच्याच पक्षाच्या अन्य खासदाराशी जोरदार भांडण झाले होते. या भांडणाचा व्हिडीओ आता प्रसारित झाला असून त्यामुळे ममता बॅनर्जी कमालीच्या नाराज आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाचे प्रमुख अमित मालवीय यांनी या प्रकरणाचा व्हॉटस् अॅप स्क्रीनशॉट प्रसारित केला आहे. त्यामुळे ही घटना सर्वांना समजली. भारतीय जनता पक्षातून तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेले किर्ती आझाद यांच्याशी कल्याण बॅनर्जी वादावादी करीत आहेत आणि कोणत्या तरी महिलेचा ‘इंटरनॅशनल लेडी’ असा उल्लेख करीत आहेत, असे चित्रण प्रसिद्ध झाले आहे.
केव्हा वादावादी झाली...
अमित मालवीय यांच्या म्हणण्यानुसार ही वादावादी 4 एप्रिलला झाली. याच दिवशी तृणमूलचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी गेले होते. आयोगाच्या कार्यालयातच ही वादावादी झाली, असे दिसून येत आहे. आपल्या सर्व खासदारांनी संसद भवनात उपस्थित रहावे आणि निवडणूक आयोगाला देण्यासाठी तयार केलेल्या पत्रकावर स्वाक्षरी करावी, असा आदेश पक्षाने काढला होता. हे पत्रक एका खासदाराजवळ देण्यात आले होते. मात्र, तो खासदार संसद भवनात न येता सरळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच गेला. त्यामुळे जोरदार वादावादी झाली. पत्रकावर स्वाक्षऱ्या न घेताच हा खासदार निवडणूक आयोगाकडे गेल्याने संसद भवनात जमलेले सर्वच तृणमूल खासदार संतप्त झाले होते. हा खासदार म्हणजेच किर्ती आझाद असल्याचा दावा आता करण्यात येत आहे.
ममता बॅनर्जी संतप्त
हे वादावादीचे प्रकरण जेव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत पोहचले, तेव्हा त्या कमालीच्या नाराज झाल्या. त्यांनी दोन्ही खासदारांना शांत राहण्याची आणि वादावादी न वाढविण्याची सूचना केली. तसेच जबाबदारीने वागण्याच्या कानपिचक्या दिल्या, असे समजते.