मनोरंजनाचा महोत्सव ; अपोलो सर्कस बेळगावात!
बेळगाव : गेल्या 14 ऑगस्टपासून बहुचर्चित अपोलो सर्कस बेळगावात सीपीएड ग्राउंड येथे सुरू झाला आहे. चमकदार दिवे, बहारदार संगीत, चित्त थरारक खेळ आणि मनोरंजनामुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.100 हून अधिक कलाकार असलेल्या या सर्कसमध्ये 40 प्रोफेशनल आणि अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांचा सहभाग आहे, जे 28 हून अधिक चित्तथरारक कृती सादर करतात. प्रत्येक शो दोन तासांचा असून, दररोज सकाळी, संध्याकाळी व रात्री असे तीन खेळ सादर केले जातात. 1000 प्रेक्षकांची बसण्याची क्षमता असलेला वॉटरप्रूफ तंबू आयोजकांनी उभारला आहे. ज्यामुळे प्रेक्षक आरामात सादरीकरणाचा आनंद घेऊ शकतात. अपोलो सर्कस एक उत्कृष्ट, जागतिक दर्जाचा शो देण्यास कटिबद्ध आहे. पारंपरिक सर्कस आणि आधुनिक कलात्मकतेच्या मिश्रणामुळे हा सर्कस जनतेचे मनोरंजन करेल. बेळगावकरांनी सहकुटुंब या सर्कशीचा आनंद लुटावा आणि कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजक सनील जॉर्ज यांनी केले आहे.
प्रमुख आकर्षण
- ग्लोब ऑफ डेथ : स्टील ग्लोबमध्ये डेअरडेव्हिल रायडर्सची थरारक मोटरसायकल कसरत.
- मणिपुरी क्रोबॅटिक्स : सुनीथ यांच्या नेतृत्वाखाली सात मणिपुरी कलाकारांचे जबरदस्त हँडस्टँड, जिम्नॅस्टिक्स आणि हवाई प्रयोग.
- बॅलन्स शो : आसामी जोडी सोनू आणि सानिया यांचा तब्बल 40 फूट उंचीवर सादर केलेला संतुलनाचा अद्भूत खेळ.
- सुपर सायकल अन् रशियन क्रोबॅटिक्स : काश्मिरी कलाकार लता यांची सायकलवरील कमाल व रशियन शैलीतील क्रोबॅटिक्स.
- वॉटर मॅजिक आणि गायन : पाण्यावर आधारित जादूचे प्रयोग आणि संगीत सादरीकरण.
- जगलिंग अन् कॉमेडी : राजन यांचा जगलिंग शो आणि जोकरांची विनोदी करमणूक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची मने जिंकतो.