शॉर्कच्या धोक्यातही पराक्रम
काही जणांना धाडसी कृत्ये करण्याचा छंदच असतो, याची आपल्याला माहिती आहे. धाडस दाखविण्यासाठी असे लोक वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात किंवा असे मार्ग शोधून काढतात. सध्या या संदर्भात अमेरिकेतील युवती कॅथरीन ब्रीड हिचे नाव चर्चेत आहे. 33 वर्षे वयाच्या या युवतीने शॉर्क माशांचा धोका असणाऱ्या सागरात 1 हजार 448 किलोमीटर अंतर पोहण्याचा विक्रम नोंदविला आहे. या जलप्रवासात तिला केवळ जीवघेण्या शॉर्क माशांशीच दोन हात करावे लागले असे नाही, तर वेगाने वाहणारे वारे, वादळे आणि चक्रीवादळे यांच्याशीही संघर्ष करावा लागला. तथापि, सर्व समस्यांवर विजय मिळवून तिने ध्येय पूर्ण केले.
कॅथरीन ब्रीड हिने 1 जुलै 2026 या दिवशी जलतरणास प्रारंभ केला. तिने अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांताचा संपूर्ण सागरतट पार केला. हे अंतर 1 हजार 448 किलोमीटर आहे. तिने आपल्या जलतरणास ओरॅगॉनच्या सीमारेषेनजीक प्रारंभ केला आणि ती 19 ऑक्टोबरला सॅन दियागो येथे तिने आपली सागरयात्रा समाप्त केली. या 111 दिवसांच्या प्रवासात तिने प्रतिदिनी साधारणत: पाच तास किंवा प्रतिदिन 16 किलोमीटर ते 24 किलोमीटर जलतरण केले. तिच्यासह या प्रवासात तिच्या संरक्षणासाठी एक 52 फूट लांबीची सागरी नौका आणि तिचे साहाय्यक तिच्यासह राहिले. या विक्रमाच्या आधी तिने ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यातील इंग्लिश खाडी आणि आयर्लंड आणि स्कॉटलंड यांच्यातील उत्तर खाडीही पोहून पार केलेली आहे. कॅलिफोर्निच्या समुद्रतटावर तिला कचऱ्याचे प्रचंड ढीग तरंगताना दिसले. त्यामुळे समुद्राचे प्रदूषण किती मोठ्या प्रमाणात अमेरिकेसारख्या प्रगत आणि सुशिक्षित लोकांच्या देशातही केले जात आहे, याचे तिला प्रत्यंतर आले. समुद्रात तिला अनेक फुगेही दिसले. आपला विक्रम पार पाडल्यानंतर तिने समुद्री प्रदूषणासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. समुद्रातील शॉर्क माशांना लोक घाबरतात. त्यांना शत्रू मानतात. तथापि, सागर प्रदूषित करणारा मानव हाच समुदांचा खरा शत्रू आहे. माझ्या या सागरयात्रेपासून लोक स्फूर्ती घेतील आणि सागरी प्रदूषण होऊ न देण्याचा प्रयत्न करतील, अशी आशा तिने व्यक्त केली आहे. आणखी सागरी विक्रम करण्याची तिची महत्वाकांक्षा असून या उपक्रमांचा उद्देश सागरी प्रदूषण टाळण्यासाठी प्रेरणा देणे हा असल्याचे तिचे प्रतिपादन आहे.
