For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन मुलांना पोरके केलेल्या बापाला सश्रम जन्मठेपेची शिक्षा

12:01 PM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोन मुलांना पोरके केलेल्या बापाला सश्रम जन्मठेपेची शिक्षा
Advertisement

ओडिशातील कुटुंब राहत होते जुवारीनगरात : 2019 मध्ये गाजलेले खुनाचे प्रकरण

Advertisement

मडगाव : जन्मदात्री आईला ठार मारुन दोन लहान मुलांना आईविना भिकारी करुन सोडणाऱ्या आणि या मुलांना आईच्या प्रेमाला सदैव भुकेल्या ठेवणाऱ्या मूळ ओडिशा राज्यातील आणि घटनेच्यावेळी झरीत-जुवारीनगर येथे राहत असलेल्या अशोक कुमार या आरोपीला मडगावच्या सत्र न्यायालयाने सश्रम जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. मडगावच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुजा कवळेकर यांच्या न्यायालयाने वरील निर्दयी आरोपीला जन्मठेपेची ही शिक्षा ठोठावली आहे. हा खटला न्यायालयात दोन सरकारी वकिलानी चालवला. सत्यवान राऊत देसाई व उत्कर्ष आवडे यांनी न्यायालयापुढे प्रभावीपणे पुरावा सादर करुन खुनाचे हे प्रकरण न्यायालयात सिद्ध केले. आपल्याच पत्नीचा गळा दाबून खून केल्याचा आरोप असलेल्या अशोक कुमार या आरोपीला मडगावच्या सत्र न्यायालयाने खुनाच्या आरोपावरुन शुक्रवारी दोषी ठरविले होते.

खून केल्याच्या आरोपावरुन भारतीय दंड संहितेच्या 302 कलमाखाली आरोपीला सश्रम जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. शिवाय आरापीला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची ही रक्कम न भरल्यास आणखी तीन महिने कैदेची शिक्षा आरोपीने भोगायची आहे. दंडाची ही रक्कम आरोपीने भरल्यास ती रक्कम भरपाई म्हणून मयताच्या मुलांना देण्यात यावी आणि त्यसाठी ती रक्कम दोन्ही मुलांच्या नावे बँकेत कायम ठेवीच्या स्वरुपात ठेवावी असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार झरी-जुवारीनगर, साकवाळ येथे 25 जानेवारी 2019 रोजी खुनाची ही घटना घडली होती. आरोपी अशोक कुमार हा आपली पत्नी के. बिंदु व दोन लहान मुलांसोबत जुवारीनगर येथे भाड्याच्या खोलीत राहात होता. मध्यरात्रीनंतर आरोपी व त्याची पत्नी यांच्यात जोरदार वाद सुरू झाला आणि आरोपीने तिचा गळा दाबून खून केला असा वेर्णा पोलिसांनी आरोपीवर आरोप ठेवला होता.

Advertisement

पाच वर्षांच्या चिमुरडीची साक्ष

सरकारपक्षातर्फे एकूण 15 साक्षीदारांनी या खून खटल्यात साक्ष दिली. आरोपीच्या 5 वर्षांच्या मुलीने दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. आपल्या वडिलांनी आपल्या आईचा दोन्ही हातांनी गळा दाबून तिला मारल्याचे आपण प्रत्यक्ष पाहिल्याची साक्ष या पाच वर्षांच्या चिमुरडीने न्यायालयात दिली होती. वेर्णा पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी या खून प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.

Advertisement
Tags :

.