For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा पुत्र ‘जेईई मेन’ टॉपर

07:00 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा पुत्र ‘जेईई मेन’ टॉपर
Advertisement

अकोल्यातील नीलकृष्ण निर्मलकुमार गजरेची कमाल : 56 विद्यार्थ्यांनी मिळवले 100 टक्के गुण

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

जेईई मेन 2024 च्या सत्र-2 चा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला असून महाराष्ट्राच्या नीलकृष्ण निर्मलकुमार गजरे या अकोल्यातील परीक्षार्थीने अखिल भारतीय पातळीवर पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याने 100 टक्के गुण मिळवले आहेत. महाराष्ट्रातील संजय मिश्रा याने दुसरा तर हरियाणातील आरव भट्टने तिसरा क्रमांक पटकावला आहे. राजस्थानचा आदित्य कुमार चौथ्या आणि हुंडेकर विदिथ पाचव्या स्थानावर आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई अॅडव्हान्स्डसाठी निकालांसह कटऑफ गुण आणि टॉपर्सची यादी देखील जारी केली आहे. जेईई मेन सेशन-2 मध्ये यावर्षी एकूण 56 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. जेईई मेन सेशन-2 मधील सर्वाधिक टॉपर्स तेलंगणातील आहेत. यानंतर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि राजस्थानातील आहेत. तेलंगणातील 15 उमेदवारांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. तर दिल्ली आणि हरियाणातील दोन परीक्षार्थींना आणि तामिळनाडू व कर्नाटकमधील प्रत्येकी एकाला 100 टक्के गुण मिळाले आहेत.

Advertisement

‘टॉपर’ आलेला नीलकृष्ण निर्मलकुमार गजरे हा विद्यार्थी महाराष्ट्रातील अकोला जिह्यातील बेलखेडम येथील रहिवासी आहे. एका छोट्याशा गावात जन्मलेल्या नीलकृष्णचे वडील निर्मल कुमार हे शेतकरी आहेत. तर आई योगिता ही गृहिणी आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब शेती व्यवसायावरच अवलंबून आहे. अभ्यासाप्रती असलेल्या समर्पण, मेहनत आणि चिकाटीमुळे आपण हे यश मिळविल्याचे नीलकृष्णने म्हटले आहे. जेईई मेनद्वारे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेण्याचे लक्ष्य घेऊन नीलकृष्णने अभ्यासात भरपूर मेहनत घेत 75 टक्के इतकी शिष्यवृत्तीही प्राप्त केली होती. नीलकृष्णने अकोला जिल्ह्यातील बेलखेड या गावात चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर कांजलतांडा येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

कोटा कोचिंगचा दबदबा

जेईई मेनमध्ये पुन्हा एकदा कोटा कोचिंगचा दबदबा दिसून आला आहे. टॉप 5 पैकी 3 विद्यार्थी कोटा कोचिंगचे आहेत. नीलकृष्ण गजरे, संजय मिश्रा आणि रँक -4 मिळवणारा आदित्य कुमार हे कोटा कोचिंगचे विद्यार्थी आहेत.

जेईई मेन 2024 सत्र-2 चे टॉप-10 टॉपर्स

  • उमेदवार               राज्य
  • नीलकृष्ण गजरे     महाराष्ट्र
  • संजय मिश्रा           महाराष्ट्र
  • आरव भट्ट             हरियाणा
  • आदित्य कुमार      राजस्थान
  • हुंडेकर विदिथ      तेलंगणा
  • मुथावरपू अनूप     तेलंगणा
  • व्यंकटसाई मदिनेनी  तेलंगणा
  • चिंटू सतीश कुमार  आंध्रप्रदेश
  • रेड्डी अनिल          तेलंगणा
  • आर्यन प्रकाश       महाराष्ट्र
Advertisement
Tags :

.