For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पीकहानीमुळे कर्जबाजारी झालेल्या होनगा येथील शेतकऱ्याची आत्महत्या

11:28 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
पीकहानीमुळे कर्जबाजारी झालेल्या होनगा येथील शेतकऱ्याची आत्महत्या
Advertisement

बेळगाव : पीकहानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या होनगा येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. विष पिऊन त्याने आपले जीवन संपविले असून काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. धाकुप्पा वैजू आनंदाचे (वय 44) रा. ज्योतीनगर, होनगा असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. दि. 14 एप्रिल रोजी विष प्याल्याने हा शेतकरी अत्यवस्थ झाला होता. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. पोलीस व कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार धाकुप्पाने आपल्या शेतात मिरची व कोबीची लागवड केली होती. अर्धे पीक पाण्याअभावी करपले तर उरलेसुरले पीक वळिवाच्या पावसाने झडून गेले. लागवडीसाठी केलेला खर्चही निघत नाही म्हणून धाकुप्पाची चिंता वाढली होती. मिरची व कोबीची लागवड करण्यासाठी या शेतकऱ्याने कर्ज उचलले होते. पीकहानीमुळे आर्थिक समस्या वाढल्या. यासंबंधी धाकुप्पाने 14 एप्रिल रोजी आपल्या पत्नीसमोर व्यथाही मांडल्या होत्या. पत्नीने धीर दिला होता. तरीही त्याच दिवशी रात्री विष पिऊन त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. काकतीचे पोलीस निरीक्षक उमेश एम. पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

सिव्हिलमधील सुरक्षा रामभरोसे...

विष प्यालेल्या धाकुप्पावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. प्रकृतीत थोडी सुधारणाही झाली होती. तरीही त्याचा त्रास कमी झाला नव्हता. या त्रासामुळे हॉस्पिटलमधून बाहेर पडून दिसेल त्या दिशेने तो सुटला. गुरुवारी सकाळी पिरनवाडी येथे बेशुद्धावस्थेत तो आढळून आला. 108 रुग्णवाहिकेतून त्याला पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारा एक रुग्ण हॉस्पिटलच्या गणवेशातच धर्मवीर संभाजी चौकापयर्तिं पोहोचला होता. यासंबंधीचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. गुरुवारी अशा घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.