Ashta News | ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली आष्टा येथील शेतकऱ्याला ८ लाखांचा गंडा
ऊसतोड मजूर पुरवण्याचे आमिष; शेतकऱ्याची 8.26 लाखांची फसवणूक
आष्टा : ऊसतोड हंगामासाठी मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून आष्टा येथील एका शेतकऱ्याची ८ लाख २६ हजार ४५३ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी विश्वास गणपती खोत (रा. खोत मळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर येथील दोन मुकादमांविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुभाष हिरु राठोड आणि प्रवीण हिरु राठोड (दोघे रा. सोमदेवहट्टी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
फिर्यादी विश्वास खोत यांनी संशयित आरोपींना २०२४ च्या हंगामातील येणेबाकी असलेले एकूण ७ लाख ४६ हजार ४५२ रुपये देणे होते. त्यानंतर आगामी २०२५-२०२६ च्या हंगामासाठी मजूर आणून देण्याच्या बोलीवर दोन्ही आरोपींनी पैसे घेतले. मागील हंगामातील बाकी, संशयितांच्या सांगण्यावरून त्यांचा कामगार श्रीकांत राठोड यास रोख ५,०००रुपये दिले.
२३ मार्च २०२५ मुकादम सुभाष राठोड याच्या सांगण्यावरून अरविंद पवार यांच्या बँक खात्यावर ३५,००० रुपये ऑनलाईन पाठवले. तसेच कर्नाटक येथे रोख रक्कम संशयितांच्या सोमदेवहट्टी या गावी जाऊन राहुल शिंगटे व इस्माईल सनदे यांच्या समक्ष ४०,००० रोख देण्यात आले. आरोपींना एकूण ८ लाख २६ हजार ४५३ रुपये दिले मात्र, २०२५-२०२६ च्या ऊसतोड हंगामाची वेळ येऊनही संशयितांनी ऊसतोड मजूर आणून दिले नाहीत.