पडणाऱ्या इमारतीचा झाला बस स्टँड
जगातील अनेक इमारती त्यांच्या नितांत सुंदर वास्तूकलेमुळे प्रसिद्ध झाले असून त्या पाहणेही पर्यटकांच्या दृष्टीने पर्वणी आहे. पण ब्रिटनमधील प्रिस्टन शहरातील एका वास्तूची कहानी विस्मयकारक आहे. वास्तविक ही इमारत पाडवली जाणार होती. ती एका बस स्टँडची इमारत होती. जुनी झाल्यामुळे ती पाडवून नवी वास्तू तेथे स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. तथापि अचानकपणे या वास्तूचे भाग्य फळफळले. या वास्तूला पारितोषिके मिळू लागली आणि आज ती जगातील सर्वात सुंदर बस स्टँड म्हणून ओळखली जाते. तिचा हा प्रवास आश्चर्यकारक आहे.
हा बस स्टँड ग्रेड 2 या श्रेणीत नोंद करण्यात आला होता. वास्तुकला आणि प्राचीनत्व या दोन्ही दृष्टीने त्याचे फार मोठे महत्त्व होते. एकेकाळी युरोपातील सर्वात मोठा बस स्टँड म्हणून त्याची ख्यातीही होती. मात्र, वास्तू जुनी झाल्यामुळे 2013 मध्ये तिचे काय करायचे यासंबंधी वेगळा विचार सुरू झाला होता. ही इमारत पाडविण्याचा निर्णय जवळजवळ झालेला होता तथापि ऐतिहासिक वास्तूंच्या संदर्भात अत्यंत संवेदनशील असणारे ब्रिटनचे संस्कृती मंत्री एडवीयाजे यांनी पुढाकार घेऊन या इमारतीला वाचविण्याचा निर्धार केला. त्यांनी या वास्तूचे नूतनीकरण करण्यासाठी योजना आखली. आणि त्यानुसार या वास्तूची दुरुस्ती केली गेली.
त्यानंतर ही वास्तू तिच्या पूर्वीच्या ख्यातीनुसार झगमगू लागली. तिला रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटीश आर्किटेक्टस् या संस्थेने अनेक पुरस्कार दिले. त्यामुळे प्रशासनाचेही लक्ष्य तिच्याकडे वेधले गेले. ती न पाडण्याचा निर्णय झाला. 2018 पासून या वास्तूने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. या वास्तूचा कायापालट करण्यासाठी 2.3 कोटी पौंडांचा खर्च करण्यात आला. आताही वास्तू ब्रिटनमधील दहा सर्वोत्तम ऐतिहासिक वास्तूंमध्ये गणली जाते. एका मंत्र्यांच्या संवेदनशील वृत्तीमुळे या वास्तूला केवळ जीवदानच मिळाले असे नाही तर तिचे पूर्वीचे महत्त्वही पुनर्जिवित झाले आहे. यावरून पुरातन वास्तूंबद्दल उदासीन असणारी प्रशासने आणि सरकारे यांनी धडा शिकणे आवश्यक आहे, अशी सामान्यांची इच्छा आहे.