Satara Crime | साताऱ्यात कॅफेच्या नावाखाली आत सुरू होतं भलतंच; पोलिसांनी छापा टाकताच समोर आलं धक्कादायक सत्य!
साताऱ्यातील कॅफेवर पोलिसांचा छापा;
सातारा :विसावा नाका येथील एका कॅफेमध्ये स्वतंत्र खोल्या तयार करून पैसे घेऊन एकांतासाठी सुविधा उपलब्ध करून देत अश्लील कृत्यास चालना दिल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी कारवाई करत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार, २९ मे रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास विसावा नाका येथील लक्ष्मी प्लाझामधील 'द लिटिल हार्ट कॅफे' येथे छापा टाकण्यात आला. कॅफेमध्ये प्लायवूड व लाकडी सनमायका वापरून स्वतंत्र पार्टिशनयुक्त खोल्या तयार करण्यात आल्या होत्या.
या खोल्या प्रति तास १०० रुपयेभाड्याने देऊन ग्राहकांना एकांतात बसण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचे तपासात आढळून आले. छाप्यादरम्यान काही युवक-युवती अश्लील कृत्य करताना आढळून आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल क्रांती जाधव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यानुसार कॅफे चालक शिवराज विश्वास नावडकर (वय २५, रा.सोनगाव बोगदा, ता. जि. सातारा), अनिकेत विकास साबळे (वय २३, रा. वडूथ, ता. जि. सातारा), सानिया बबलू मुजावर (वय २२, रा. संगमनगर, सातारा), नाज सलीम शेख (वय २१, रा. मंगळाई कॉलनी, शाहूनगर-गोडोली, सातारा), मेहबूब रफिक शेख (वय २३, रा. साई सोसायटी, गोळीबार मैदान, गोडोली, सातारा) आणि शाहरुख सिराज शेख (वय २१, रा. लासुर्णे, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ४९, ३(५) आणि २९६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.