ब्लॅक स्पॉट हटविण्याच्या मोहिमेला अपयश?
नागरिकांचा बेफिकीरपणा, कचरा टाकणे सुरूच
बेळगाव : शहर व परिसरातील ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न सुरू असले तरी त्याला अद्याप म्हणावे तसे यश आलेले नाही. ज्या ठिकाणचे ब्लॅक स्पॉट हटविण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्या ठिकाणी पुन्हा नागरिकांकडून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी फुलांची सजावट, बाकडे किंवा इतर शोभेच्या वस्तू ठेवूनही कचरा टाकला जात असल्याने कचरा टाकणाऱ्यांवरच कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी ठेकेदार आणि महानगरपालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी घरातील कचरा रस्त्याच्या कडेला किंवा उघड्यावर न टाकता घंटागाडीकडेच द्यावा, अशी सूचना केली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात सकाळच्या वेळी घरोघरी घंटागाडी येत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
त्यामुळेच घंटागाडीची वाट पाहून शेवटी नागरिकांकडून कचरा रस्त्याच्या कडेला फेकून दिला जात असल्याचे बोलले जात आहे. विविध ठिकाणचे ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत. पण या प्रयत्नांना काही केल्या यश येत नसल्याने अधिकारीही आता हतबल बनले आहेत. नानावाडी रोडवर मोठ्या प्रमाणात दररोज उघड्यावर कचरा टाकला जात आहे. त्या ठिकाणच्या कचऱ्याची नियमित उचल केली जात आहे. पण कचऱ्याची समस्या मात्र सुटलेली नाही. मध्यंतरी त्या ठिकाणी कचऱ्याची उचल करणारी गाडी दिवसभर तैनात केली होती. यानंतर आता ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी आकर्षक सजावट करण्यासह सूचना फलक लावण्यात आले आहेत. तरीदेखील नागरिकांकडून पुन्हा त्या ठिकाणी कचरा टाकून दिला जात आहे. त्यामुळे ही समस्या मार्गी लावायची असल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.