हलक्या मध्यम प्रतीच्या जमिनीत फुलविली ड्रॅगन फ्रुटची बाग
चोरे / दिलीप साळुंखे :
उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या चोरेसारख्या डोंगरी भागात हलक्या मध्यम जमिनीत मुंबई येथे नोकरी-व्यवसाय करून जमविलेली पुंजी शेतात घालण्याचे धाडस शशिकांत माने यांनी केले. तीन वर्षांपूर्वी सात लाख रुपये भांडवल घालून ड्रॅगन रोपांची लागण केली. आज नऊशे ग्रॅमचे फळ मुंबई मार्केटला जात असल्याने कष्टाचे चीज झाल्याची भावना माने यांच्या मनात आहे.
२०२३ ला वडिलोपार्जित तीस गुंठे शेतीत नवीन उपक्रम करायचा म्हणून धाडस करून हूँ गन फ्रुटसाठी शेती तयार केली. मशागत करून शेणखताचा वापर केला. बोअरच्या पाण्यातून ठिबक यंत्रणा तयारी केली. सिमेंटचे खांब आणून वेळोवेळी रोपांची बांधणी केली. दशपर्णी अर्क, कृषी अमृत सेंद्रिय खत व एससीटी वैदिक खते यांचा वापर या बागेसाठी करतो, असे माने म्हणाले. एकदा लागण केली की तीन वर्षे हे रोप चांगले जोपासले तर किमान २५ वर्षे यातून उत्पादन मिळू शकते. कमी पाणी व निचऱ्याची जमीन असल्यामुळे जास्त तण येत नाही. लागण केल्यापासून फुल धरेपर्यंत लहान मुलांसारखे बागेचे संगोपन केले आहे. बुरशी, इतर किडी यापासून बचाव करण्यासाठी नेहमी फवारणी करावी लागते.
तीन वर्षे संगोपन केल्यानंतर यावर्षी जुलै महिन्यात पहिला फळांचा बहार साधारण पाचशे ते साडेपाचशे किलो मिळाला आहे. ही सर्व फळे मुंबईत जोतिबा फुले बाजारात म्हणजेच क्रॉ फर्ड मार्केटमध्ये ८० रुपये किलो दराने विक्री केली. याच वर्षी जुलै महिन्यात दुसरा तोडा अडीचशे किलोचा १०० रुपये दराने विक्री केली. यावेळी खर्च वजा करून ४५ ते ५० हजार रुपये मिळाले आहेत.
माने यांनी लागवड केलेली व्हरायटी आहे जम्बो रेड अमेरिकन ब्युटी ड्रॅगन फ्रुट. याला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. आंतरपीक म्हणून गहू, भुईमूग आणि कांदा यांचेही उत्पादन त्यांनी घेतले आहे.
यावर्षी पहिले फळ घेतले. बागेत साधारणपणे १८० ते ९०० ग्रॅम पर्यंत गुलाबी रंगाची टवटवीत फळे निघाली आहेत. भागातील अनेक होतकरू शेतकरी बागेला भेट देऊन माहिती घेत आहेत. परिसरात हा पहिलाच प्रयोग मुंबईतील नोकरी-व्यवसाय सांभाळून माने यांनी केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
- युवकांनी ड्रॅगन फ्रुट शेतीकडे वळावे
माझ्या आई-वडिलांना आंबा या फळाविषयी खूप प्रेम होते. त्यांनी अनेक झाडे लावली. डोक्यावरून पाणी आणून झाडे जगविली. ड्रॅगन फ्रुट फळाची वाढती मागणी लक्षात घेऊन लागवड केली. तीन वर्षांनी बाग फुलून एका किलोच्या आकाराची फळे साक्षात दिसू लागल्याने मनाला फार समाधान वाटले. होतकरू युवकांनी कमी पाणी असल्यास वर्षानुवर्षे फायदा देणाऱ्या या ड्रॅगन फ्रुट शेतीकडे वळावे.