पुनरागमनातील ‘डबल धमाका’ !
श्रीलंकेतील मालिकेनं आपलं कौशल्य पुन्हा सिद्ध करण्याची संधी दिली ती देवदत्त पडिक्कलला अन् या शैलीदार डावखुऱ्या फलंदाजानं ती वाया जाऊ दिली नाही...इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी करूनही नंतर कसोटी संघातील स्थान गमवाव्या लागलेल्या कर्नाटकच्या या खेळाडूनं दणदणीत पुनरागमन करताना लागोपाठ दोन कसोटींत झळकावलेली शतकं त्याचा तिसऱ्या क्रमांकावरचा दावा मजबूत बनवून गेलीत...
कोलंबो कसोटी सामन्याचा पहिला दिवस...श्रीलंकेनं ‘त्याचे दोन’ झेल सोडले तेव्हा खात्यात दोन देखील धावा जमा झाल्या नव्हत्या.....पहिली संधी शून्यावर, तर दुसरी एका धावेवर...‘त्यानं’ या मिळालेल्या जीवदानांचा पुरेपूर फायदा घेत शतक झळकावलं...तो टप्पा गाठल्यानंतर ‘त्यानं’ जेव्हा आपली बॅट उंचावली तोपर्यंत श्रीलंकेला त्या दोन चुकांची किंमत मोजत दोन सत्रं घाम गाळण्याची पाळी आली होती...धावफलकावर ‘त्याच्या’ नावापुढं अखेरीस आकडा चमकला...117...नशिबानं ‘त्याला’ संधीचं दार उघडून दिलं अन् ‘त्यानं’ आपल्या जिद्दीनं त्याचं सोनं केलं...कर्नाटकचा देवदत्त पडिक्कल...
त्याआधीच्या आठवड्यात गॉल येथील सामन्यात पडिक्कलनं पहिल्या डावातही शतकाची नोंद करताना 230 चेंडूंमध्ये फटकावलेल्या 167 धावा ही केवळ एक मोठी धावसंख्या नव्हती, तर त्यातून घडलं ते आत्मविश्वासपूर्ण खेळाचं दर्शन. त्यानं कधी पुढं जात, तर कधी ‘बॅकफूट’वर फिरकीला कसं तोंड द्यायचं ते व्यवस्थित दाखवून दिलं...देवदत्तनं दुसऱ्या डावात भर घातली ती 44 धावांची. या पार्श्वभूमीवर डावखुरा फिरकीपटू मानव सुथारनं सामन्यात 10 बळी घेतलेले असूनही सामनावीर पुरस्कार चालून आला तो त्याच्याकडे...भारतानं ही कसोटी 165 धावांनी खिशात घातली...
खरं तर मूळ संघात देवदत्तची वर्णी लागलेली नव्हती. साई सुदर्शन दुखापतग्रस्त झाल्यामुळं श्रीलंका दौऱ्यासाठी त्याच्या जागी भारतानं त्याला बोलावलं. पण दोनच कसोटी सामन्यांनंतर ज्याला बदली खेळाडू म्हणून आणलं होतं आता संघातून वगळणं कठीण बनलंय...दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वालचं अर्धशतक पाच धावांनी हुकलं, के. एल. राहुलला 18 धावा काढून परतावं लागलं अन् शुभमन गिलनं 50 धावांचा टप्पा गाठला, तर रिषभ पंत दुखापतीमुळं निवृत्त झाला. मात्र पडिक्कल मैदानात टिकून राहिला. त्याची ही खेळी सुऊवातीपासून शेवटपर्यंत चमकदार होती असं म्हणता येणार नाही. सुऊवातीला मिळालेल्या त्या दोन जीवदानांनंतर तशी अपेक्षा करणंही चुकीचं. देवदत्तला मनातील अस्वस्थता दूर करावी लागली, ते सुटलेले झेल विसरावे लागले आणि नव्यानं सुऊवात करावी लागली. त्याच्या या खेळीतील हीच सर्वांत महत्त्वपूर्ण बाब...
देवदत्त पडिक्कलनं झेप देखील अशाच प्रकारे घेतलीय...भारतीय क्रिकेटला एक प्रतिभावान खेळाडू म्हणून त्याची ओळख सर्वप्रथम झाली ती ‘आयपीएल’मधून...2020 मध्ये जेव्हा तो ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर’तर्फे मैदानात उतरला तेव्हा अवघ्या 20 वर्षांचा. त्यानं आपली छाप पाडण्यास वेळ न लावता पहिल्या चार सामन्यांतच तीन अर्धशतकं झळकावली. पडिक्कलनं पदार्पणाच्या हंगामात एकूण 473 धावा केल्या आणि ‘इमर्जिंग प्लेयर’ हा पुरस्कार पटकावला. पुढच्याच वर्षी त्यानं ‘आयपीएल’मध्ये नाबाद शतक झळकावलं. ‘ऑफ साइड’ला सुरेख फटके मारणाऱ्या, नैसर्गिक सलामीवीर वाटणाऱ्या या 6 फूट 3 इंच उंचीच्या डावखुऱ्या फलंदाजाचं ‘टी-20’ क्रिकेटमधील स्टार असं वर्णन लगेच सुरू झालं अन् त्यात नवल वाटण्याजोगं काही नव्हतं...
त्यानंतर देवदत्त पडिक्कलला भारतातर्फे खेळण्याची सर्वप्रथम संधी मिळाली होती ती श्रीलंकेविरुद्ध आणि त्या दोन टी-20 सामन्यांत त्यानं नोंदविल्या त्या 38 धावा. त्यापैकी पहिल्या लढतीत 23 चेंडूंत 29...त्यावेळी भारतातर्फे खेळणारा या सहस्रकात जन्मलेला तो पहिला पुऊष क्रिकेटपटू ठरला होता. मात्र त्यानंतर त्याला कधीही मर्यादित षटकांच्या संघांची दारं उघडी झाली नाहीत....त्याऐवजी त्याला पसंती मिळाली ती कसोटीत. 2024 च्या सुऊवातीला धर्मशाला इथं इंग्लंडविऊद्ध शानदार पदार्पण करताना देवदत्तनं 65 धावा काढल्या होत्या. परंतु त्याला त्यानंतर केवळ एकच कसोटी सामना खेळणं शक्य झालं ते त्याच वर्षी पर्थ इथं....
दुखापतीमुळं इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडावं लागल्यानंतर पडिक्कलवर पाळी आली ती कसोटी संघात पुनरागमनासाठी योग्य संधीची वाट पाहण्याची. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या दमदार कामगिरीमुळं दावेदारी अधिक बळकट झाली. त्यानं 2025-26 मोसमातील रणजी चषक स्पर्धेत 60.33 च्या सरासरानं जमविल्या त्या 543 धावा. यात उत्तराखंडविऊद्ध केलेल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम 232 धावांच्या खेळीचाही समावेश...
तसं पाहिलं तर देवदत्त पडिक्कलनं देशी क्रिकेटमध्ये नेहमीच चांगली कामगिरी केलीय...त्याचा पहिला पूर्ण हंगाम हा 2019-20 चा. त्यातील विजय हजारे चषक स्पर्धेत त्यानं 609 धावांचा रतीब ओतून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान मिळवला. 2023-24 मध्ये पाच सामन्यांत त्याची सरासरी 155 इतकी जबरदस्त राहिली, तर 2025-26 च्या स्पर्धेत त्यानं पाच सामन्यांत चार शतकं झळकावली. अशी कामगिरी केलेल्या खेळाडूला आतापर्यंत नक्कीच एकदिवसीय सामन्यांच्या संघाची दारं उघडी व्हायला हवी होती, पण तसं काही घडलं नाही...
देवदत्त पडिक्कल ‘टी-20’मुळं प्रसिद्धीच्या झोतात आला, त्यानं 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली, तरीही कसोटी क्रिकेट हेच आपलं अंतिम ध्येय असल्याचे तो नेहमी सांगत असे. याचं कारण त्याच्यात दडलाय त्यासाठी लागणारा संयम आणि वर्चस्व गाजवण्याच्या दृष्टीनं आवश्यक कौशल्य...त्याच्याकडे नव्हती ती ती संघातील पक्की जागा. त्यात त्याला दगा दिला तो साथ न देणाऱ्या शरीरानं...एका टप्प्यावर देवदत्तची कारकीर्द सरळ नि योग्य दिशेनं वाटचाल करत असल्याचं दिसत होतं...
पण 2022 च्या ‘आयपीएल’पासून दिवस फिरले...पोटाच्या त्रासाकडे पडिक्कलनं सुऊवातीला ‘अन्न बाधा’ म्हणून पाहिलं, पण हा त्रास कायम राहून तो वारंवार आजारी पडू लागला, त्याला ऊर्जा टिकवून ठेवणं कठीण जाऊ लागलं अन् अखेरीस त्याचं वजन घटलं ते सुमारे 10 किलोंनी. वैद्यकीय चाचण्यांत त्याला आतड्यांशी संबंधित एका गंभीर आजारानं ग्रासल्याचं निदान झालं. या पार्श्वभूमीवर 2023 च्या सुऊवातीपर्यंत देवदत्तवर पाळी आली ती तंदुऊस्त व निरोगी राहण्यासाठी संघर्ष करण्याची...या आजारामुळं त्याच्या मनस्थितीवर आणि खेळावरही परिणाम झाला....
देवदत्त पडिक्कलनं आपली फलंदाजी संतुलन नि ‘टायमिंग’वर उभारली होती. ते तंत्र टिकवणं त्याला कठीण जाऊ लागलं. त्या वर्षांची तो ‘खूप थकविणारीं’ असं वर्णन करते. पण त्यानं धीर खचू दिला नाही...त्याच्या शब्दांत सांगायचं झाल्यास तो खेळाचा अधिक आनंद घेण्याच्या निर्धारानं परतला....पडिक्कलनं आपल्या आहाराची रचना बदलली, तंदुऊस्ती पुन्हा मिळवली. आणि त्याच्यात लपलेल्या फलंदाजाचा पुनर्जन्म घडविला...
देवदत्त पडिक्कलला ‘आयपीएल’मध्ये सुऊवातीचं यश मिळालं ते सलामीला फलंदाजी करताना. पण तो ‘राजस्थान रॉयल्स’मध्ये गेल्यावर परिस्थिती बदलली. तिथं जोस बटलर नि यशस्वी जैस्वाल यांची आघाडीफळीत जोडी जमली होती. त्यामुळं पडिक्कलला फलंदाजीच्या क्रमवारीत खालचं स्थान मिळालं. अचानक हा नैसर्गिक सलामीवीर ‘पॉवरप्ले’नंतर फलंदाजीला येऊ लागला. तोपर्यंत क्षेत्ररक्षक विखुरलेले असायचे, चेंडू मऊ झालेला असायचा अन् फिरकी गोलंदाज लगेच आक्रमण करायचे. या पार्श्वभूमीवर त्याला वेगवान गोलंदाजीविऊद्ध सुऊवातीला मिळणारी लय हरवली...
हा काळ त्याच्या कारकिर्दीतील अधोगतीचा असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाहीये...पुढं लखनौ सुपर जायंट्समध्ये दाखल झालेल्या देवदत्तला ‘2024 च्या ‘आयपीएल’मध्ये सात सामन्यांत फक्त 38 धावा करता आल्या. या आकडेवारीत क्षमता होती ती एखाद्या खेळाडूची टी-20 कारकीर्द सहज संपविण्याची. मात्र 2025 च्या हंगामात ‘आरसीबी’मध्ये ‘घरवापसी’ केल्यानंतर त्यानं उसळी घेत 2026 ग्rप् ‘आयपीएल’मध्ये नोंद केली ती 168.72 च्या ‘स्ट्राईक रेट’नं 464 धावांची...
याभरात देवदत्त पडिक्कलनं तिसऱ्या नि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली, ‘लेग-साइड’ला फटके मारण्यावर परिश्रम घेतले, फिरकी गोलंदाजीविऊद्ध पायांचा वापर अधिक प्रभावीरीत्या करण्यास प्रारंभ केला, बॅकफूटवरील खेळ सुधारला आणि सुऊवातीचे काही चेंडू खेळून स्थिरावण्याऐवजी थेट आक्रमक होत धावांचा वेग वाढविण्याचे मार्ग शोधले...बदललं नाही ते फक्त त्याचं ‘टायमिंग’ अन् आता श्रीलंकेत पुन्हा घडलंय ते त्याचंच दर्शन !
पराक्रम देवदत्तचे...
- देवदत्त पडिक्कलच्या शतकांना ऐतिहासिक महत्त्व लाभलंय. भारताच्या स्वातंत्र्यदिनी कसोटी शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरलाय...या कामगिरीची तुलना केली जाते ती विराट कोहलीनं 2019 मध्ये वेस्ट इंडिजविऊद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 99 चेंडूंत काढलेल्या नाबाद 114 धावांशी. कारण भारतीय प्रमाणवेळेनुसार ती खेळी 15 ऑगस्टच्या पहाटे संपली...
- 21 व्या शतकात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कसोटी शतक फटकावणारा पडिक्कल हा केवळ दुसरा भारतीय डावखुरा फलंदाज. याआधी सौरव गांगुलीनं अशी कामगिरी केली होती ती 2002 मध्ये दिल्ली इथं झिम्बाब्वेविऊद्ध (136 धावा)....
- गेल्या 30 वर्षांत परदेशात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कसोटी शतक झळकावणारा देवदत्त हा सहावा भारतीय. या यादीत समावेश आहे तो गांगुली, राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, चेतेश्वर पुजारा नि अजिंक्य रहाणेचा...
- देवदत्त पडिक्कलच्या खेळीनं संपविलाय तो बराच काळ अस्थिर राहिलेल्या तिसऱ्या क्रमांकावरील शतकाच्या बाबतीत पडलेला दुष्काळ. कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजाकडून शेवटच्या शतकाची नोंद झाली होती ती सप्टेंबर, 2024 मध्ये. त्यावेळी शुभमन गिलनं चेन्नईत बांगलादेशविऊद्ध ही कामगिरी केली होती...
- राजू प्रभू