औषध कंपन्यांना ‘टॅरिफ’चा डोस
ब्रँडेड औषधांवर आता अमेरिकेत 100 टक्के कर : डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा : 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी
वृत्तसंस्था/ शिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी आणखी एक मोठी घोषणा करत भारतासह कोणत्याही ब्रँडेड औषध उत्पादनांच्या आयातीवर 100 टक्के कर लावण्याची घोषणा केली. हा कर 1 ऑक्टोबरपासून लागू केला जणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. ‘जोपर्यंत एखादी कंपनी अमेरिकेत उत्पादन कारखाना उभारत नाही तोपर्यंत 1 ऑक्टोबर 2025 पासून आम्ही कोणत्याही ब्रँडेड किंवा पेटंट केलेल्या औषध उत्पादनावर 100 टक्के कर लादू,’ असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर हा निर्णय जाहीर केला.
अमेरिका ही भारतीय औषध उत्पादकांसाठी एक मोठी बाजारपेठ आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ब्रँडेड किंवा पेटंट केलेल्या औषधांवर 100 टक्के कर जाहीर केला आहे. हा कर 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होईल. अमेरिकेत औषध निर्मिती कारखाने उभारणाऱ्या कंपन्यांना हा कर लागू होणार नाही. अमेरिकेच्या अध्यक्षांनी आधीच भारतावर 50 टक्के कर लादला असून तो 27 ऑगस्टपासून लागू झाला आहे. यामुळे कपडे, रत्ने आणि दागिने, फर्निचर आणि सीफूड यासारख्या भारतीय उत्पादनांच्या निर्यातीचा खर्च वाढला आहे. तथापि, या करांमधून सुरुवातीला औषधे वगळण्यात आली होती.
सध्या ब्रँडेड औषधांवरील कर वाढवण्याचा निर्णय
ट्रम्प यांनी ब्रँडेड औषधांवर शुल्क लादण्याचा निर्णय अमेरिकेत औषधांचे उत्पादन वाढवण्यासाठी घेतला आहे. हा निर्णय त्यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ आणि ‘मेक इन युएस’ धोरणांचा एक भाग आहे. औषधांसाठी इतर देशांवर अवलंबून राहणे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करते. साथीच्या काळात याचा प्रभाव जाणवतो. जर पुरवठा साखळी तुटली तर अमेरिकेला औषधांचा तीव्र तुटवडा जाणवू शकतो. ब्रँडेड औषधांवर दबाव आणून ट्रम्प संपूर्ण औषध पुरवठा साखळी सुरक्षित करू इच्छितात, असे स्पष्टीकरण व्हाईट हाऊसकडून देण्यात आले आहे.
जेनेरिक औषधांवर तूर्तास शुल्क नाही
जेनेरिक औषधे ब्रँडेड औषधांपेक्षा 80 टक्के ते 90 टक्के स्वस्त आहेत. अमेरिकन आरोग्य सेवा प्रणाली जेनेरिक औषधांवर खूप अवलंबून आहे. जर जेनेरिक औषधांवर 100 टक्के शुल्क लादले गेले तर त्यांच्या किमती गगनाला भिडतील. यामुळे अमेरिकन नागरिकांसाठी आरोग्यसेवा लक्षणीयरित्या महाग होईल, ज्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार असल्याने तूर्तास जेनेरिक औषधांवर अतिरिक्त व्यापार शुल्क लादण्यात आलेले नाही.
किचन कॅबिनेट, बाथरूम व्हॅनिटीजवर 50 टक्के कर
अमेरिकेने किचन कॅबिनेट, बाथरूम व्हॅनिटीज आणि सर्व अॅक्सेसरीजवरही कर लादला. 1 ऑक्टोबर 2025 पासून आम्ही स्वयंपाकघरातील कॅबिनेट, बाथरूम व्हॅनिटी आणि सर्व अॅक्सेसरीजवर 50 टक्के कर लादण्यास सुरुवात करू. याव्यतिरिक्त आम्ही अपहोल्स्टर्ड फर्निचर (अपहोल्स्टर्ड किंवा फोम फर्निचर) वर 30 टक्के कर लादू, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
भारतावर फारसा परिणाम जाणवणार नाही
अमेरिका ही औषध उत्पादनांसाठी भारतातील सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे. उद्योग संस्था, फार्मास्युटिकल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या मते 2024 च्या आर्थिक वर्षात भारताच्या एकूण 27.9 अब्ज डॉलर्स किमतीच्या औषध निर्यातीपैकी 31 टक्के किंवा 8.7 अब्ज डॉलर्स अमेरिकेला गेले. अहवालानुसार, भारत अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या 45 टक्केपेक्षा जास्त जेनेरिक आणि 15 टक्के बायोसिमिलर औषधांचा पुरवठा करतो. डॉ. रे•ाrज, ऑरोबिंदो फार्मा, झायडस लाईफसायन्सेस, सन फार्मा आणि ग्लेनमार्क फार्मा सारख्या कंपन्या त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी 30-50 टक्के उत्पन्न अमेरिकन बाजारपेठेतून मिळवतात असे म्हटले जाते. तथापि, भारत प्रामुख्याने अमेरिकेला जेनेरिक औषधे निर्यात करतो. सध्या त्यांना टॅरिफमधून सूट आहे. त्या तुलनेत ब्रँडेड औषधांची निर्यात फारच कमी असल्यामुळे अमेरिकेने 100 टक्के कर लादला तरी भारतीय औषध कंपन्यांवर फारसा परिणाम होईल असे वाटत नाही.