ड्युटीवर डुलकी श्वानाला पडली महागात
पोलीस विभागाने दिली शिक्षा, बोनसमध्ये कपात
चीनचा पहिला कॉर्गी पोलीस डॉग ‘फुजाई’ला वर्षाअखेरीस मिळणाऱ्या बोनसमध्ये कपात झाली आहे. यामागील कारणही विचित्र आहे. ड्युटीदरम्यान डुलकी घेतल्याने आणि स्वत:च्या खाण्याच्या प्लेटमध्ये मूत्रविसर्जन केल्याने त्याला ही शिक्षा मिळाली आहे.
28 ऑगस्ट 2023 रोजी जन्मलेल्या फुजाईला केवळ वयाच्या 2 महिन्यांमध्येच शेंडोंग प्रांताच्या वेइफांग पोलीस डॉग ट्रेनिंग बेसमध्ये भरती करण्यात आले होते. झाओ किंगशुआई, चांगले काउंटी पब्लिक सिक्युरिटी ब्युरोच्या ट्रेनरने त्याला एका पार्कमध्ये पाहिले, त्याची पोलीस डॉग होण्याची क्षमता ओळखली, यानंतर त्याला स्फोटके शोधून काढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. जानेवारी 2024 मध्ये तो रिझर्व्ह एक्सप्लोसिव्ह डिटेक्शन डॉग म्हणून काम करू लागला.
प्रथम लाड आता शिक्षा
फुजाईचा गोंडस चेहरा, कमी उंची यामुळे तो चीनमध्ये इंटरनेट स्टार ठरला. ऑक्टोबर 2024 मध्ये त्याने अधिकृतपणे पोलीस डॉग म्हणून स्वत:चे प्रशिक्षण पूर्ण केले. आता फुजाईलच्या सोशल मीडियावर ‘कॉर्गी पोलीस डॉग फुजाई अँड इट्स कॉम्रेड्स’ नावाच्या अकौंटवर त्याचा प्रवास शेअर केला जात राहिला आहे, हे पेज वेइफांग पब्लिक सिक्युरिटी ब्युरोकडून हाताळले जाते.
शिक्षेची घोषणा
19 जानेवारी रोजी फुजाईच्या मागील वर्षाच्या कामगिरीचा जल्लोष करण्यात आला. त्याला रेड फ्लॉवर, ट्रीट्स आणि टॉयज देत सन्मानित करण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्याने त्याचे प्रथम कौतुक केले, परंतु मग त्याने फुजाईची कृत्यं ठीक नव्हती असे सांगितले. ड्युटीदरम्यान झोपणे अन् खाण्याच्या प्लेटमध्ये मूत्रविसर्जन केल्याने त्याला शिक्षा देण्यात आली आहे.