इचलकरंजीत डॉक्टरची 93 लाखांची फसवणूक
तिघांविरोधात गुन्हा दाखल
आकर्षक परताव्याच्या आमिषाने लुटले
कोल्हापूर
व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून गुपच्या अॅडमिनसह तिघांनी शहरातील एका वैद्यकीय व्यावसायिकाची तब्बल 93 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डॉ. दशावतार गोपालकृष्ण बडे (वय 56, रा. जवाहरनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. केरशी तावडिया, राशी अरोरा आणि कंपनीच्या कस्टमर केअर सेंटर अशी फसवणूक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसातून मिळालेले माहिती अशी, फिर्यादी डॉ. बडे यांना अॅक्सीस स्टॉक एक्सचेंज कंपनीचे मुख्य मार्गदर्शक केरशी तावडिया आणि सहाय्यक राशी अरोरा यांनी कंपनीच्या गुंतवणुकीविषयी आकर्षक परताव्याचे आश्वासन दिले. यामुळे डॉक्टरांचा विश्वास संपादन करत त्यांनी कंपनीत मोठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. या कालावधीत, 13 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2024 दरम्यान, डॉ. बडे यांनी 93 लाख 35 हजार रुपये संबंधित खात्यांमध्ये भरले. मात्र, या कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा परतावा मिळालेला नाही. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. बडे यांनी कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनसह तीन जणांविरोधात तक्रार नोंदवली.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केरशी तावडिया, राशी अरोरा आणि कंपनीच्या कस्टमर केअर सेंटर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तिघांच्या संगनमताने करण्यात आलेल्या या फसवणुकीने व्यापारी व गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.