विविधतेने नटलेली-बहरलेली ग्रंथदिंडी लक्षवेधी साहित्य संमेलन-ग्रंथदिंडी
उचगाव : उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित 23 व्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाने प्रतिवर्षी एक वेगळेपण जपत यावर्षी संतांची पाद्यपूजा करून संमेलनाचे उद्घाटन थाटात करण्यात आले. यावर्षीही विविधतेने नटलेली आणि बहरलेली ग्रंथदिंडी दिमाखात निघून लक्षवेधी ठरली. साहित्य संमेलनाचा सोहळा अनेक साहित्यिक आणि दिग्गज कवींसह हजारो साहित्यप्रेमींच्या लक्षणीय उपस्थितीत यशस्वी झाला. येथील गणेश विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणातील गांधी चौकात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला होता.
सकाळी 9.30 वाजता ग्रंथदिंडी मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी गणेश मंदिरातील गणेश मूर्तीचे पूजन युवा नेते आणि म. ए. समितीचे सुधीर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. विठ्ठल रखुमाई मूर्ती पूजन उचगाव ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे आणि उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीराम पूजन व्यापारी तुकाराम पाटील यांच्या हस्ते, पालखी पूजन तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांच्या हस्ते, ग्रंथदिंडी पूजन एपीएमसी माजी सदस्य आर. के. पाटील यांच्या हस्ते, ग्रंथदिंडीचे उद्घाटन स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या 1982 च्या दहावी बॅच विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रंथदिंडी ढोल, ताशा, लेझीम पथकाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन म. ए. समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथदिंडी कचेरी गल्लीमार्गे संमेलनस्थळी दाखल झाली. या ठिकाणी जय किसान भाजी मार्केटमधील दीपक ट्रेडर्सचे मालक दीपक नवार यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते ग्रा. पं. माजी सदस्य बी. एस. होनगेकर यांच्या हस्ते मळेकरणी देवीचे पूजन करण्यात आले. संमेलनासाठी उभारलेल्या कै. लक्ष्मण शटूप्पा होनगेकर सभामंडपाचे उद्घाटन मल्लव्वा बाडीवाले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
उद्घाटन प्रतिवर्षी नाविन्यपूर्ण
येथील साहित्य संमेलनाचा शुभारंभ 2000 साली दीपप्रज्वलनाने झाला. यानंतर प्रतिवर्षी वेगळेपण जपत या साहित्य संमेलनाचे उद्घाटन रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. यानंतर अपंगांना आर्थिक साहाय्य करून उद्घाटन करण्यात आले. यंदा 23 व्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन संतांची पाद्यपूजा करून द. म. शि. मंडळाचे खजिनदार एन. बी. खांडेकर दांपत्याच्या हस्ते करण्यात आले. स्वागत अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर, सेक्रेटरी एन. ओ. चौगुले, कार्याध्यक्ष बाळासाहेब देसाई व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लक्ष्मणराव होनगेकर यांनी शिक्षक आणि साहित्यप्रेमींना काहीतरी वेगळे दिल्याचे समाधान मिळाल्याचे प्रास्ताविकात सांगितले. सूत्रसंचालन प्रदीप झांजरी, नाथाजी मरगाळे, प्रा. महादेव खोत यांनी केले. स्वागतगीत बेळगुंदीतील बालवीर विद्यानिकेतनच्या मुलींनी सादर केले. सेक्रेटरी एन. ओ. चौगुले यांनी आभार मानले.