भुतानीविरोधी आंदोलनाला वेगळे वळण
उपोषण खोटे असल्याचा दोघा माजी सरपंचांचा दावा : प्रेमानंद नाईक यांचा शौचालयातील व्हिडियो प्रसारित, आज आंदोलक मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
वास्को : सांकवाळच्या भुतानी प्रकल्पाविरूद्ध चाललेल्या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असतानाच रविवारी या आंदोलनाला वेगळे वळण मिळाले. सांकवाळच्या दोघा माजी सरपंचांनी उपोषणकर्त्या प्रेमानंद नाईक यांचा व्हिडियो प्रसारित करून खळबळ उडवून दिली. प्रेमानंद नाईक हे टॉयलेटमध्ये जाऊन काही तरी खातात व पितात असा हा व्हिडियो होता. तो काल गोवाभर व्हायरल झाला. उपोषण हे ढोंग असून आंदोलनकर्त्यांवर आमचा विश्वास नाही, असे माजी सरपंचांनी म्हटले आहे. भुतानी प्रकल्पाविरूद्ध आंदोलन करणाऱ्यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. हे नाट्या रचणाऱ्यांनी महिलांची अब्रूही धोक्यात आणलेली असून त्याविरूद्ध पोलिस कारवाई व्हावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. सांकवाळच्या भुतानी इन्फ्राच्या नियोजित महानिवासी प्रकल्पाविरूद्ध माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा काल रविवार हा सातवा दिवस होता. मात्र, प्रेमानंद नाईक यांचे उपोषण खोटे ठरवण्याचा प्रयत्न करणारा एक व्हिडियो माजी सरपंचांनी माध्यमांसमोर प्रसारित केला. तो वाऱ्यासारखा पसरला. सांकवाळ पंचायतीचे माजी सरपंच नारायण नाईक व रोकोझिन वालीस या दोघांनी माध्यमांसमोर येऊन प्रेमानंद नाईक यांचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न केला.
प्रेमानंद नाईक स्वार्थी : नाईक
आम्ही गावात होणाऱ्या भुतानी प्रकल्पाला विरोधच करीत आहोत. मात्र, आंदोलन करणाऱ्या प्रेमानंद नाईक व काही जणांवर आमचा विश्वास नाही. ते स्वार्थ साधून मागे हटणारे आहेत. त्यामुळेच आम्ही या आंदोलनापासून दूर आहोत असे माजी सरपंच नारायण नाईक यांनी स्पष्ट केले. उपोषणाबद्दल संशय होताच माजी सरपंच रोकोझिन वालीस व सुनिल गावस या नागरिकानेही माध्यमांकडे बोलताना प्रेमानंद नाईक यांच्यावर आरोप केले. त्यांची पार्श्वभूमी योग्य नाही. ते ऐवढे दिवस उपाशी राहूच शकत नाहीत हे आम्ही जाणून होतो. एवढे दिवस उपाशी राहूनही त्यांची तब्येत फारशी खालावली नव्हती. त्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटत होते. त्यांचा व्हिडियो आमच्या हाती लागलेला असून उपोषणाच्या नावाखाली प्रत्यक्षात ते काय करतात हे व्हिडियोमध्ये दिसत आहे, असे स्पष्ट करून ते अंडा रोल खात असल्याचा तसेच मद्यपान करीत असल्याचा दावा केला. त्यांनी उपोषणाचे ढोंग केलेले आहे. ते लोकांना फसवत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. प्रेमानंद नाईक यांनी उपोषण बंद करावे व पोलिसांनी त्यांची त्वरित वैद्यकीय चाचणी करावी. आम्ही या प्रकरणी पोलीस तक्रार करू असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
मात्र, त्या व्हिडियोचा भुतानीविरूद्धच्या आंदोलनावर कोणताही परिणाम झाल्याचे दिसले नाही. सातव्या दिवशीही प्रेमानंद नाईक यांचे उपोषण सुरू राहिले. संध्याकाळी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने सांकवाळचे स्थानिक लोक व गोव्यातील इतर भागातून नागरिक उपोषणस्थळी एकत्र आले होते. प्रेमानंद नाईक यांच्यावर करण्यात येत असलेले आरोप खोटे आहेत. त्यांची नाहक बदनामी करण्यात येत असल्याचे स्पष्ट करून बदनामी करणाऱ्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. सदर व्हिडियोच्या प्रकरणाची सरकारने चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. त्या व्हिडियोच्या प्रश्नावर सभेत वातावरण तापले.
त्या शौचालयात केवळ प्रेमानंद नाईकच नव्हे तर अनेक महिलाही गेल्या होत्या. त्यांचेही चित्रण झालेले असावे, असा संशय व्यक्त करून हे प्रकरण गंभीर असून महिलांमध्ये लज्जाभाव व भीती निर्माण झालेली आहे. शौचालयातील चित्रीकरणात कोणकोण गुंतलेले आहेत याची चौकशी व्हावी अशी मागणी करून त्यासाठी पोलिस तक्रार करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. त्या व्हिडियोच्या प्रकरणामुळे भुतानी प्रकल्पाला कोणाकोणाचा पाठींबा आहे हेच उघड झालेले असून आंदोलनाला वाढता पाठींबा मिळत असल्यानेच हे आंदोलन अयशस्वी व्हावे म्हणून व्हिडियोचे प्रकरण रचण्यात आलेले आहे असा आरोप सभेत करण्यात आला.
आज सोमवारी उपोषणाचा आठवा दिवस असून या दिवशी भुतानी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उपोषणकर्ते प्रेमानंद नाईक यांच्यासह सर्व आंदोलकांनी पणजीत जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटावे असा निर्णयही या सभेत घेण्यात आला. त्यानुसार आज सकाळी अकरा वाजता आंदोलक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. स्थानिक आमदार अँथनी वास, आमदार व्रुझ सिल्वा, माजीमंत्री मिकी पाशेको, ओलान्सीयो सिमोईस, शरद चोपडेकर, फादर बॉलमॅक्स परेरा, गोकुवेदचे गोविंद शिरोडकर, तारा केरकर, प्रतिमा कुतिन्हो, रामा काणकोणकर, शंकर पोळजी, सॅबीना मार्टीन्स, अरूणा वाघ, स्वप्नेश शेर्लेकर, पंच तुळशिदास नाईक, पंच मॉरीलियो कार्व्हालो यांच्यासह गोव्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सांकवाळ अगेन्स्ट मेगा प्रोजेक्टस् यांनी या सभेचे आयोजन केले होते.
दरम्यान, रविवारी दुपारी पणजीतील आझाद मैदानावरही सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो, रामा काणकोणकर, शंकर पोळजी, अॅना ग्रासियस व इतरांनी व्हिडियो प्रकरणाचा निषेध केला. व्हिडियो काढणाऱ्यांनी व त्या दोघा माजी सरंपचांनी गावचे हित हवे असेल तर आंदोलनात सहभागी का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला. व्हिडियो प्रकरण हे नियोजनबद्ध कारस्थान असून तो गंभीर गुन्हा आहे. पोलिसांनी या कृत्याविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी केली.