गणरायाला भक्तिभावाने निरोप
सातारा :
दहा दिवस आपल्या घरी, आपल्या हृदयात, आपल्या श्रद्धेत स्थान देणाऱ्या लाडक्या गणरायाला रविवारी जिल्हाभरात डोळ्यात पाणी, हृदयात कृतज्ञता आणि ओठांवर ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करत निरोप देण्यात आला. राजधानी सातारा... जिथं प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौक, प्रत्येक वळण हा भावनेने भारावून गेला होता. तब्बल 22 तास सुरू मिरवणूक सुरु होती.
कुठे डॉल्बीचे ठसकेदार बीट्स, कुठे पारंपरिक ढोल-ताशांचा दणदणाट, कुठे लेझीमचे झंकार आणि मध्येच भिजलेल्या डोळ्यांनी हात जोडून भाविक बाप्पाला निरोप देत होते.
राजधानी सातारा शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 22 तास सुरू होती. शेवटच्या मानाच्या शंकरपार्वती (महादेव) गणपतीचे विसर्जन रविवारी सकाळी 11 वाजता गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात करण्यात आले. या गणेशोत्सव मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सातारा पोलीस दल डोळ्यात अंजन घालून काम करताना दिसत होते. जिह्यातील सुमारे 7 हजार गणेशोत्सव मंडळानी आपल्या बाप्पांना निरोप दिला.

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी दहाव्या आणि अकराव्या दिवशी जिह्यात विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. शनिवारी दुपारी 2 वाजता काही ठिकाणी मानाच्या गणपतीच्या मिरवणूक सुरू झाल्या. त्यांनतर इतर मंडळाच्या मिरवणुका निघाल्या. सातारा शहरात सातारा नगरपालिका गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक दुपारी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरू करण्यात आली. त्यानंतर शहरातील इतर गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका निघाल्या होत्या. त्यात शहरातील मानाचे गणपतीही होते. काही मंडळांचा डॉल्बी तर काही मंडळानी पारंपरिक वाद्याला पसंती दिली होती. सातारा शहरात मिरवणूक पाहण्यासाठी सातारकरांची अलोट गर्दी उसळली होती. कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, विभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, पोलीस निरीक्षक निलेश तांबे आणि सर्व कर्मचारी डोळ्यात तेल घालून बंदोबस्त करताना दिसत होते. रात्री 12 च्या ठोक्याला डीजेसारखी वाद्य बंद झाली. मात्र मिरवणुका सुरू होत्या. पहाटे पुन्हा त्या मिरवणुकीत रंग भरत सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शेवटच्या मानाच्या गणपती शंकर पार्वतीचे विसर्जन केले.
विसर्जन तळ्याच्या ठिकाणी सातारा पालिकेने मोठा हॅलोजन, मोठी क्रेन, सीसीटीव्ही आणि कर्मचारी नियुक्त केल्यामुळे मोठे गणपती सुद्धा क्रेनच्या माध्यमातून तळ्यात विसर्जन करण्यात आले. यामध्ये सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, मुख्य अभियंता दिलीप चिद्रे, अभियंता वडई, अभियंता वैराट, अभियंता शहाजी वाठारे, अभियंता दिग्विजय गाढवे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम, आरोग्य विभागाचे प्रमुख राकेश गालियाल, गणेश काकडे यांच्यासह सर्वच कर्मचारी भक्तिभावाने विसर्जन प्रक्रिया राबविण्यात सहभागी झाले होते. सातारा पालिकेने विशेषत: आरोग्य विभागाचे वतीने निर्माल्यासाठी वेगळे कुंड केल्याने तो ही चांगला उपक्रम होता. तसेच संगममाहुली येथे ही विसर्जन करण्यासाठी गर्दी झाली होती.