देवभक्ताचा प्रेमकलह
माणसे ऋणानुबंधाने जवळ येतात आणि तो संपताच दूर होतात. दूर होण्याची अनेक कारणे असतात. त्यात एक प्रमुख कारण म्हणजे भांडण. भांडणे कोणत्याही कारणावरून व कशावरूनही होऊ शकतात. कालपर्यंत गळ्यात गळा घालून एकमेकांविषयी गोड गोड बोलणारी माणसे अकस्मात दूर होतात. इतकी की एकमेकांचे तोंडही बघत नाहीत. विकोपाचे भांडण माणसांना माणसांपासून क्षणात दूर करते आणि सलगीचे, प्रेमाचे भांडण प्रेमाची गोडी वाढवून पुन्हा अधिक जवळ आणते.
समाजात अनेक प्रकारची माणसे असतात. त्यांचे स्वभाव-विभाव, बोलणे-चालणे, व्यक्त होणे हे देखील विविध प्रकारचे असते. विचारांची दिशा जो मार्ग दाखवेल त्याप्रमाणे आयुष्याचा प्रवास चाललेला असतो. त्या वाटेवर जिवाच्या प्रारब्धानुसार, कर्मानुसार अनेकांच्या भेटी होतात. त्यात गाव, शहर, प्रदेश यांचाही समावेश होतो. माणसे ऋणानुबंधाने जवळ येतात आणि तो संपताच दूर होतात. दूर होण्याची अनेक कारणे असतात. त्यात एक प्रमुख कारण म्हणजे भांडण. भांडणे कोणत्याही कारणावरून व कशावरूनही होऊ शकतात. कालपर्यंत गळ्यात गळा घालून एकमेकांविषयी गोड गोड बोलणारी माणसे अकस्मात दूर होतात. इतकी की एकमेकांचे तोंडही बघत नाहीत. विकोपाचे भांडण माणसांना माणसांपासून क्षणात दूर करते आणि सलगीचे, प्रेमाचे भांडण प्रेमाची गोडी वाढवून पुन्हा अधिक जवळ आणते.
संतसाहित्याचा अभ्यास करताना देवभक्ताचा प्रेमकलह मती गुंग करतो. विटेवरच्या विठ्ठलाभोवती प्रदक्षिणा घालीत ज्यांचे जीवन घडले, त्यांनी विठूशी पदोपदी भांडण केले आहे आणि त्याला आपल्या हृदयापाशी आणलेले आहे. संत तुकाराम महाराज दिवस-रात्र त्या विठ्ठलाजवळ देहमनाने गुंतलेले आहेत. एकसारखा संवाद चाललेला आहे. त्यातूनच भांडणाचा उगम आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना शंका वाटते, हा विठ्ठल भक्तांमध्ये भेदभाव करतो. खरे म्हणजे विठोबाची ख्याती आहे, तो लहान-थोर, गरीब-श्रीमंत काहीही बघत नाही. त्याला साधा बुक्का आणि तुळस चालते. तरीही हा विठुराया माझ्याशी नीट वागत नाही. हा माझ्यामध्ये आणि इतरांमध्ये भेद करतो. कसा बरे? तर महाराज म्हणतात, ‘ऐके ऐके गे विठ्ठले ।आम्ही तुझे काय केले?।’ विठ्ठले अशी हाक मारलेली आहे. विठोबामधल्या वात्सल्यमूर्ती आईशी ते बोलत आहेत. आई, तू माझ्याकडे का बरे लक्ष देत नाहीस? आम्ही तुझे काय केले? ‘एकनाथ काय काका? । त्याचे पाणी वाहसी फुका ।’ संत एकनाथांच्या घरी श्रीखंड्या नाम धारण करून विठू चाकर म्हणून राब राब राबला. पाण्याचा रांजण गोदावरी नदीचे पाणी आणून रोज कावडीने भरला. महाराज म्हणतात, ‘ते काय तुझे काका लागतात का? फुकटात तिथे तू पाणी भरलेस. संत कबीरांचा तुला एवढा पुळका का? ते काय तुझे मामा आहेत का? त्यांचे शेले एवढ्या प्रेमाने का बरं विणलेस? त्यांना का बरे एवढी मदत करू लागलास? ‘कबीर काय तुझा मामा? । शेले विणसी पुरुषोत्तमा?’ ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ असं म्हणणारे सांवतामाळी तुझे पिता आहेत का? त्यांच्या उदरात तू का बरे गडप झाला? एक आख्यायिका अशी आहे- एकदा भक्त कुर्मदास यांच्या भेटीसाठी पांडुरंग स्वत: ज्ञानदेव व नामदेवांना घेऊन लहूळ या गावी चाललेला होता. वाटेत सांवता माळी यांचे अरणभेंडी हे गाव लागले. पांडुरंग तेव्हा म्हणाला, तुम्ही दोघे इथेच थांबा. मी सांवतोबांना मळ्यात भेटून येतो. विठुराया मळ्यात जाऊन सांवतोबाला म्हणाला, ‘अरे, माझ्यामागे दोन चोर लागलेत. मला चटकन कुठेतरी लपव.’ तेव्हा सांवतोबाने विठुरायाला आपल्या पोटात लपवले. बाळरूप धारण करून विठोबा त्यांच्या पोटात गुप्त झाला. बराच वेळ झाला, विठोबा का आला नाही, म्हणून ज्ञानदेव, नामदेव मळ्यात त्याला शोधत आले. सांवतामाळी तेव्हा नामस्मरणात दंग होते. विठोबा कुठे दिसेना. तेव्हा नामदेवांनी व्याकुळ होऊन विठोबाला साद घातली. त्या क्षणी विठोबा सांवतोबाच्या पोटातून बाहेर आला. असे म्हणतात ना, ‘पोटात एक आणि ओठात एक.’ माणसाच्या पोटात वेगळेच जग असते. मात्र सांवतोबाच्या पोटात तो विश्वंभर गुप्तपणे लपून बसला. त्याचे पोट शुद्ध होते. एवढा मोठा अधिकार सांवतोबाचा होता. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘सावतामाळी काय बाप? । त्याचे उदरी झाला गप ?’
संत नामदेवांचे आणि विठोबाचे प्रेम तर जगजाहीरच आहे. संत नामदेवांच्या हातून विठोबाने दहीभात खाल्ला. संत नामदेवांचा पुत्र गोंदा यांनी श्री नामदेव चरित्र लिहिले आहे. ते फारच गोड आहे. एकदा दामाजी आणि गोणाई हे नामदेवांचे मातापिता परगावी गेले. जाताना नामदेवाला सांगून गेले की विठोबाला खायला घालून मग तू अन्न सेवन कर. लहानग्या नामदेवाने विठोबापुढे नैवेद्य ठेवला. परंतु तो जेवीना. हे बघून नामदेवाने जो धावा केला तो अद्भुत आहे. ‘अरे मायबापा विठ्ठला, तू जेवत का नाहीस? तू जेवला नाहीस तर माझी आई मला घरात घेणार नाही.’ तरी पांडुरंग आपला ढिम्मच. मग काय झाले? ‘वाहीन शिरकमळ म्हणे नामदेव.’ दोरीचा फास गळ्याला लावला. तेव्हा पांडुरंग रखुमाईसह नाम्याला घेऊन जेवला. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘नामदेव काय मावसा? त्याचे संगे जेविसी कैसा?’ नामदेव महाराज काय तुझ्या मावशीचे पती होते? त्यांच्या हातून तू का जेवलास? संत नामदेवांची दासी जनी, ती काय तुझी मावशी लागत होती का? तिची सगळी कामे तू केलीस? संत जनाबाई विठोबाची भक्तवत्सलता आपल्या अभंगातून सांगतात. एके दिवशी जनी न्हायला बसली तेव्हा विसाणाला पाणी नव्हते. त्यावेळी विठोबाने घागरी हाती घेऊन रांजणामध्ये ओतल्या. जनाबाई म्हणतात, ‘ऐशा येरझाऱ्या केल्या । रांजण घागरी भरल्या?’ जनीला धान्य दळू लागणे, कांडू लागणे ही सर्व कामे विठोबांनी केली. तेव्हा विठोबाला सर्वांगी घाम आला. त्याने पितांबर भिजला. त्याच्या हाताला फोड आला. महाराज म्हणतात, ‘जनी काय ते मावशी? तिचे संगे तू राबसी?’ मग मला का दूर लोटून दिले? अभंगाची शेवटची ओळ फार महत्त्वाची आहे. ‘तुका म्हणे घेतली आळ । सलगीने बोले बाळ?’ विठुराया, मी तुझे लेकरू आहे म्हणून तुझ्याशी सलगीने भांडतोय. विठोबाशी भांडण करायला अधिकार हवा. सामान्य माणसे संकटात सापडली, दारिद्र्यांनी गांजली की देवाला शरण जातात आणि त्यांचे काम झाले नाही की त्यालाच दोष देतात. त्याच्याशी भांडतात. या भांडणामध्ये प्रेम नाही. उद्धाराची तळमळ नाही. त्या भांडणात असतो तो केवळ स्वार्थ. अप्पलपोटेपणा. या भांडणाने काहीही साधत नाही.
संत तुकारामांची पत्नी आवली कमरेवर हात ठेवून तटस्थपणे बघणाऱ्या विठोबाशी कडाकडा भांडते. संत तुकोबांचा पुत्र, पहिली पत्नी रखमाचा मुलगा संतू हा अन्नपाण्याविना देवाघरी गेला, तेव्हा तुकोबाराय अश्रूभरल्या नयनांनी एकच घोष करत होते, ‘विठ्ठल, विठ्ठल.’ हे ऐकून आवली संतापली. त्या विठोबाचा उद्धार करू लागली. ती तर विठोबाला धोंड्याच म्हणते. काळ्या म्हणते. ‘आमच्या भरल्या घराचे वाटोळे केले. काळतोंड्या, घराचा काळ झालास. या धोंड्याने घर, शेती, दुकान, प्रपंच सारे काही हिसकावून घेतले. मदत तर सोडाच, पतीलाही वेडे केले. मामंजी गेले, सासुबाई गेल्या, थोरल्या सुनबाई, थोरल्या बाई, सर्वजण गेले. आता हे लहानगे पोरगेही गेले. आता आम्हाला गिळ आणि शांत हो.’ आवलीचा हा रुद्रावतार बघून संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘आवले, तू पांडुरंगावर रागावतेस, कारण त्याचे अस्तित्व तू मान्य करतेस. तू त्याच्यावर जास्त प्रेम करतेस. म्हणून तर भांडतेस ना! परमप्रेम करणारा विठ्ठल म्हणून माझ्यापेक्षाही तुझ्या जास्त संगती आहे. जेथे जातो तेथे हा पांडुरंग तुझा सांगाती आहे.’
सामान्य माणसांची भांडणे आयुष्य रसातळाला नेत असतात. कधी कधी ती आयुष्याची राखरांगोळी करतात. सर्व संतांनी अधिकारवाणीने आणि प्रेमाने देवाशी केलेली भांडणे समजून घेतली तर देव आणि भक्ताचा प्रेमकलह माणसाला सोपी पायवाट दाखवतो. संत तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, ‘तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे.’ या भवसागरातून मनुष्य सहजरीत्या पार होतो.
स्नेहा शिनखेडे
