निर्गुणाचा ओळख पटलेला भक्त सगुणाची उपासना करत असतो
अध्याय नववा
साक्षी मी प्रकृति-द्वारा उभारी सचराचर । त्यामुळे सर्व सृष्टीची ही घडामोड होतसे ।। 10 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यात भगवंत अर्जुनाला असे सांगत आहेत की, अर्जुना मायेची निर्मिती मी करतो आणि ती माया समस्त प्राणिमात्रांना निर्माण करते. मायेची निर्मिती माझी असल्याने ह्या विश्वाच्या निर्मितीला मी निमित्त आहे असे म्हणता येईल. हे सर्व विश्व मीच व्यापलेले असल्याने हे प्राणीमात्र माझ्यातच होते आणि काहीकाळ ते व्यक्त झाले व कालांतराने पुन्हा अव्यक्तात गेले असे घडत असले तरी मी मात्र त्यांच्यात कधीच नसतो. तुला हा माझा ऐश्वर्ययोग जाणून घ्यायचा असेल तर इंद्रियांवर संयम करून त्यांना स्वत:च्या ताब्यात ठेव आणि बाह्य गोष्टींकडे दुर्लक्ष करून अंतर्मुख हो. तुला अंतर्मुख होणे जोपर्यंत जमणार नाही, तोपर्यंत माझी स्वरूपस्थिती अनुभवास येणार नाही. तसेच निर्गुण जाणल्यावर तो भक्त माझ्यातच मिसळून जात असल्याने त्याला मिळालेला निर्गुणाचा अनुभव कथन करायला तो अस्तित्वात रहात नाही. भगवंताच्या अनन्य भक्तांनी ही गुह्य गोष्ट ओळखली असल्याने त्यांनी निर्गुणाची ओळख पटल्यावर त्यांनी सगुणाची उपासना सुरू ठेवणेच पसंत केले कारण जर निर्गुण स्वरुपात मिसळून गेले तर मग त्यांना देवांची भक्ती करायची संधी कशी मिळणार? भागवतात भगवंतांनी उद्धवाला आत्मज्ञान झाल्यावर मुक्ती देऊ केली असता तो देवांना म्हणाला, देवा तुमचा कावा मी ओळखला कारण पूर्वी अनेकांना तुम्ही ह्या पद्धतीने फसवले आहे पण मी फसणार नाही. मला मुक्ती नको तर मुक्तीच्या वरची अवस्था प्राप्त करून द्या जेणेकरून मी सदैव तुमची भक्ती करत राहीन. तुकाराम महाराजांचे ह्याबाबतीतील मागणे मांडताना ते म्हणतात ह्याच जन्मात काय पुढील कित्येक जन्मात मला तुझी भक्ती करायची संधी मिळूदेत. मनुष्य जन्मातले सगळ्यात मोठे दु:ख हे गर्भवासाचे असते कारण त्यात खाली डोके वर पाय ह्या अवस्थेत नऊ महिने रहावे लागते आणि चिंचोळ्या जागेतून आईच्या देहातून बाहेर पडावे लागते पण मनुष्यदेहाशिवाय भक्ती करायची संधी मिळत नाही म्हणून महाराज म्हणतात, मुक्ती आणि संपदा आम्हाला नको तसेच आम्ही गर्भवासाचे दु:खही आनंदाने सोसायला तयार आहोत. तो अभंग असा, हेंचि दान देगा देवा ।तुझा विसर न व्हावा ।।1।। गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व गोडी ।।2।। न लगे मुक्ति आणि संपदा ।संतसंग देई सदा ।।3।। तुका म्हणे गर्भवासी । सुखें घालावें आम्हासी ।।4।। असे भक्त भगवंतांच्या भक्तीत इतके मशगुल होतात की, ते त्यांचे दैनंदिन जीवनातील कामकाज करायचेही विसरून जातात. भक्तांच्या भक्तीचे देवाला ओझे होते व त्यांचे ऋण फेडावे ह्या उद्देशाने, तसेच त्यांना भक्तीत मग्न होता यावे म्हणून तो जगजेठी स्वत: त्यांची कामे करू लागतो. असे भक्ताचे आणि भगवंतांचे एकमेकांवर निरतिशय प्रेम असते. हा निरपेक्षतेने केलेल्या भक्तीचा परिपाक असतो. केवळ एकमेकांवर प्रेम करायला मिळावे म्हणून असे भक्त आणि भगवंत वेगवेगळे राहतात अन्यथा ते एकमेकांत केव्हाच मिसळून गेलेले असतात. क्रमश: