For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनन्य भक्ताला स्वत:च्या देहाचा विसर पडलेला असतो

06:50 AM Apr 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
अनन्य भक्ताला स्वत च्या देहाचा विसर पडलेला असतो
Advertisement

अध्याय आठवा

Advertisement

मद्भक्तो मत्परऽ सर्वसंगहीनो मदर्थकृत् । निक्रोधऽ सर्वभूतेषु समो मामेति भूभुज ।। 26 ।। हा ह्या अध्यायातला शेवटचा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार बाप्पा म्हणताहेत, हे भूपा, मत्पर, सर्वसंगरहित, माझ्याकरितां सर्व कर्मे करणारा, क्रोधरहित, सर्व भूतांचे ठिकाणी समान असा माझा भक्त मजप्रत येतो.

विवरण- हा ह्या अध्यायातला कळीचा श्लोक आहे असं म्हंटलं तरी चालेल. बाप्पा सांगताहेत, माझा भक्त माझ्याशी अनन्य असल्याने मत्पर झालेला असतो. तो मी सांगतो त्याप्रमाणे आणि तेव्हढेच करणारा असतो. त्यामुळे तो स्वत:चा स्वभाव मागे टाकून माझेच रूप घेऊन वावरत असतो. स्वत:च्या स्वभावाला मुरड घालून बाप्पांच्या सांगण्याप्रमाणे वागणे म्हणजे सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे तंतोतंत वागणे ही भक्तीची परिसीमा आहे. हे समजलं तरी करणं फार कठीण असतं. कारण माणसाचा मूळ स्वभाव बदलणं जवळजवळ अशक्य असतं. एकवेळ दोर जळेल पण त्याचा पीळ जळत नसतो. त्याप्रमाणे आयुष्य संपत आलं तरी माणसाचा स्वभाव बदलत नाही असं म्हणतात. स्वभाव दुरीतोक्रमऽ असं संस्कृत वचनही आहे पण अनन्य भक्त मात्र ह्याला अपवाद असतो. त्याला स्वत:चा विसर पडलेला असल्याने तो फक्त माझं अस्तित्व मानत असतो. त्यामुळे तो स्वत:च्या स्वभावाला विसरू शकतो.

Advertisement

अशी भक्ती, ईश्वरावर अतोनात निरपेक्ष प्रेम करणे ह्या गोष्टी एका रात्रीत होत नाहीत. ह्या गोष्टी पायरीपायरीने घडत जातात. सर्वप्रथम ईश्वराकडून काहीतरी मिळवण्यासाठी त्याची भक्ती करायला मनुष्य सुरवात करतो. ईश्वराला असे भक्तही प्रिय असतात. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तो त्यांना हवे असेल ते पुरवतो. त्यातून त्यांची ईश्वराप्रती असलेली भक्ती वाढू लागते. ईश्वराच्या कृपेने त्यांच्या हळूहळू लक्षात येऊ लागते की, भक्तीच्या बदल्यात ईश्वराकडून मिळवलेल्या गोष्टी ह्या नाशवंत आहेत, त्या कितीही मिळवल्या तरी अपुऱ्या आहेत. मग ते कायम टिकणारी वस्तूच्या म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करू लागतात. बाप्पा पुढे सांगतात, ईश्वराच्या भक्तीत ते इतके तन्मय होतात की, त्याच्याशिवाय स्वत:सकट इतर कोणत्याही गोष्टीचं अस्तित्व त्याला मान्य नसतं. त्यामुळे देहाबद्दलचं त्याचं ममत्व पूर्णपणे नष्ट झालेलं असतं. म्हणजे त्याची देहबुद्धी शून्य झालेली असते. देहबुद्धी नष्ट होणे हीच सर्वसंगरहित अवस्था होय. त्याला सर्वांच्याबद्दल आदर, प्रेम वाटत असते पण त्याला त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नसते. त्यामुळे तो मोहपाशात अडकलेला नसतो. असा भक्त आयुष्य केवळ माझ्या सेवेत घालवत असतो. मलाच सर्वोत्कृष्ट समजत असतो. माझ्यावर अतिशय प्रेम करत असतो. त्याला समोरच्या वस्तूंचे, व्यक्तींचे आकार, रंगरूप निरनिराळे दिसत असले तरी त्याच्या दृष्टीने त्या सर्व ब्रह्मस्वरूपच असतात. त्यामुळे तो सर्वांच्यात माझेच अस्तित्व पहात असतो. त्याला सर्वत्र मीच दिसत असतो. भक्त प्रल्हादाची अशीच अवस्था झाली असल्याने त्याला समोरच्या निर्जीव खांबातही ईश्वराचे दर्शन झाले. अनन्य भक्तावर इतरांनी त्याच्याशी केलेल्या वाईट वागणुकीचा यत्किंचितही परिणाम होत नाही. कारण त्याच्या लेखी त्यांचे अस्तित्वच नगण्य असते. त्यामुळे त्याला कुणाचाही राग येत नाही किंवा कुणाबद्दल लोभ वाटत नाही. ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक असते ते करून तो निरपेक्षपणे बाजूला होतो. अशा भक्ताला ज्ञानचक्षु प्राप्त होतात.

या अध्यायाचा शेवटी दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेऊयात की, चिंतन करणे व पाहणे ह्या दोन शक्ती ईश्वराने माणसाला दिलेल्या आहेत. त्या वापरून भगवंतांच्या विभूतींचं नेहमी चिंतन करूयात आणि सर्वत्र ईश्वराला पाहण्याची सवय लावून घेऊयात...

अध्याय आठवा समाप्त

Advertisement
Tags :

.