पर्वतांवर वसलेले निर्जन शहर
शहरापर्यंत जाण्यासाठी नाही निर्मिला रस्ता
एंडीज पर्वतरांगेच्या दुर्गम उंचीवर सेवेल नावाचे शहर वसलेले असून ते इंजिनियरिंगचे उदाहरण आहे. परंतु हे शहर आता पूर्णपणे निर्जन आहे. पण याच्या शांत भिंती त्या काळातील साक्षीदार आहेत, जेव्हा येथे लोकांची वस्ती असायची. लोकांचा गजबजाट असायचा आणि कुठल्याही वाहन किंवा रस्त्याशिवाय हे शहर जगाला तांबे पुरवत होते. चिलीच्या माचाली भागात एंडीज पर्वतांवर समुद्रसपाटीपासून सुमारे 2 हजार मीटरच्या उंचीवरील हे शहर आता घोस्ट टाउन ठरले आहे.
सेवेलला 1905 मध्ये ब्रेडन कॉपर कंपनीने वसविले होते. या शहराच्या निर्मितीचा मुख्य उद्देश जगातील सर्वात मोठ्या भूमिगत तांब्याची खाण 20एल टेनिएंटे’मध्ये काम करणारे कामगार आणि त्यांच्या परिवारांना राहण्याची जागा देणे होते. हे चिलीमधील पहिले असे शहर होते, ज्याला पूर्णपणे एका कंपनीने स्वत:च्या साधनसामग्रीला मिळविणे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्थापित केले होते. सेवेलचे सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे याची रचना होती. हे शहर एंडीज पर्वतरांगेच्या उभ्या आणि खडकाळ शिखरांवर वसलेले असल्याने येथे कुठलाही समतळ रस्ता निर्माण करणे अवघड होते. अशास्थितीत येथे जिने तयार करण्यात आले, जे रेल्वेस्थानकापासून सुरू होते शहराच्या सर्वात वरच्या हिस्स्यापर्यंत जात होते. शहराच्या मुख्य हालचाली याच जिन्याच्या आसपास व्हायच्या.
पार्टनरच्या सन्मानार्थ नाव
याच मार्गात अनियमित आकाराचे सुंदर चौक निर्माण करण्यात आले होते, जेथे सजावटी वृक्ष आणि रोपं लावण्यात आली होती. रस्त्यांच्या जागी जिने असलेल्या या शहराच इमारती लाकडाने निर्मित होत्या आणि त्यांना चमकणारा हिरवा, पिवळा, लाल अणि निळा रंग देण्यात आला होता. प्रारंभी सेवेल खाणीनजीक एक छोटासा कॅम्प असायचा. 1915 मध्ये ब्रेडनचा पार्टनर बार्टन सेवेलच्या सन्मानार्थ याचे नाव ‘सेवेल’ ठेवण्यात आले. एक रेल्वेमार्ग तयार करण्यात आला, ज्याने या दुर्गम वस्तीला रंकागुआ शहराशी जोडले. हा रेल्वेमार्ग प्रथम महायुद्धादरम्यान तांब्याची मोठी मागणी पूर्ण करण्यासाठी जीवनरेषा ठरला. लवकरच येथे बहुमजली इमारतींचे जाळे विणले गेले, ज्यात खाणीचे कामगार राहत होते.

शहरात होत्या आधुनिक सुविधा
15 हजार लोकसंख्या असलेल्या या शहरात सर्व आधुनिक सुविधा होत्या, ज्यात रुग्णालय, चर्च, शाळा, सोशल क्लब, थिएटर आणि बॉलिंग एली आणि गरम पाण्याचा स्वीमिंग पूलही होता. अरुंद रेल्वेमार्गावरील रेल्वेगाडी शहरासाठी धान्य आणि आवश्यक सामग्री आणत होती. तर तांब्याच्या अयस्कला विशाल बादल्यांद्वारे पर्वतांवरून खाली नेले जात होते. शहर त्या काळातील प्रगत खाण तंत्रज्ञान आणि वास्तुकलेचा संगम होते.
शहराला जागतिक वारसास्थळाचा दर्जा
1960 च्या दशकाच्या अखेरपर्यंत चिलीमध्ये तांबे उद्योगाचे राष्ट्रीयकरण झाले आणि हे सरकारी संपत्ती ठरले. याच काळात सरकारने लोकांना पर्वतांच्या या दुर्गम उंचीवरून हटवत रंकागुआमध्ये वसविण्याचा निर्णय घेतला. हळूहळू शहर खाली होऊ लागले आणि 1980 पर्यंत हे पू,र्णपणे एका खाण वस्तीच्या स्वरुपात सोडून देण्यात आले. मग जुन्या इमारती पाडविण्यात आल्या. 1980 च्या दशकाच्या अखेरीस ही तोडफोड रोखण्यात आली आणि 1998 मध्ये याला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात आले. 2006 साली युनेस्कोने याला जागतिक वारसास्थळ घोषित केले.