समत्वबुद्धीने घेतलेला निर्णय नितीशास्त्राला धरुन अचूकच असतो
अध्याय दुसरा
समत्वबुद्धीचा वापर करून कर्म केल्यास काय फायदा होतो ते सांगताना भगवंत म्हणाले, समत्वबुद्धीने घेतलेले निर्णय नितीशास्त्राला धरून असल्याने योग्य असतात. त्यानुसार केलेल्या कामाला चांगले किंवा वाईट असा शेरा पडत नाही. समत्वबुद्धीने घेतलेला निर्णय अचूकच आहे अशी खात्री झाल्याने तो निर्धास्त असतो. त्यामुळे ते काम करण्यास आवश्यक असलेले कौशल्य माणसाला सहजी प्राप्त होते. म्हणून बुद्धीयोगच श्रेष्ठ असल्याने फलेच्छा न धरता या योगाचे ठिकाणी तू निश्चल हो. त्यामुळे तुझी बुद्धी स्थिर होऊन तुझ्याकडून कर्मयोगाची तत्वे पाळून निर्णय घेतले जातील. त्यातून केलेल्या कर्मांना पाप-पुण्याची बाधा होत नाही. कर्मयोगाची तत्वे पाळून जे निर्णय घेतात, तेच संसारातून पार पडून पाप-पुण्याच्या बंधनातून सुटतात.
कर्मफलाच्या त्यागाबद्दल अधिक सांगताना भगवंत पुढील श्लोकात म्हणतात, बुद्धीयोगाचा म्हणजे समत्व बुद्धीचा अवलंब करणारे ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फलाचा त्याग करतात. म्हणून ते जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन अच्युतपदी विराजमान होतात.
ज्ञानी समत्व-बुद्धीने कर्माचे फळ सोडुनी । जन्माचे तोडिती बंध पावती पद अच्युत ।। 51 ।।
श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, ज्ञानी लोक नेहमीच योग्य मार्गावर राहून कर्म करत असल्याने त्यांची जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमचीच सुटका होते. त्यांना कुणी काहीही सांगितलं किंवा त्यांच्या कानावर काही आलं तरी त्याकडे लक्ष देत नाहीत. ही समत्वबुद्धी तुला अच्युतपद मिळवून देईल. अच्युत हे विष्णूचे एक नाव आहे. त्याचे पद प्राप्त होणे म्हणजे विष्णूलोकात किंवा वैकुंठलोकात स्थान मिळणे. तिथे गेलेला मनुष्य कधीही पदावनत होत नाही. ध्रुवबाळाला वडिलांच्या मांडीवर बसायला मिळाले नाही म्हणून त्याने वनात जाऊन तपश्चर्येच्या बळावर विष्णूला प्रसन्न करून घेतले आणि त्यांनी देऊ केलेल्या वराने अढळपदाची म्हणजे अच्युतपदाचीच मागणी केली.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, जेंव्हा तुझी बुद्धी मोहरूपी पातकांतून पूर्णपणे तरुन जाईल, त्यावेळी तू जे ऐकलेले आहेस आणि पुढे ऐकशील त्याबद्दल तू सहज विरक्त होशील.
लंघूनि बुद्धी जाईल जेंव्हा हा मोह-कर्दम । आले येईल जे कानी तेंव्हा जिरविशील तू ।। 52 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, अर्जुना, तू स्वजनांच्या मोहाच्या चिखलात अडकला आहेस. जेव्हा तू ह्या मोहातून बाहेर येशील त्यावेळी आपोआपच तुझ्यात वैराग्याचा संचार होईल. त्यामुळे तू समत्व बुद्धीचा वापर करून योग्य निर्णय घेणारा होशील. तुझ्यात निर्दोष आणि गहन असे आत्मज्ञान उत्पन्न होईल, तुझे अंत:करण सर्वप्रकारे सहजच निरिच्छ होईल. अशा मन:स्थितीत, आणखी काही मिळवावे, कांही जाणावे किंवा मागे जाणलेल्या गोष्टीचे स्मरण करावे, या सर्वच क्रिया थांबतील. कुणी काहीही सांगितलं किंवा काही कानावर आलं तरी त्याकडे तुझे आपोआप दुर्लक्ष होईल. अशा मन:स्थितीत, आणखी काही मिळवावे, काही जाणावे किंवा मागे जाणलेल्या गोष्टीचे स्मरण करावे, या सर्वच क्रिया थांबतील. कुणी काहीही सांगितलं किंवा काही कानावर आलं तरी त्याकडे तुझे आपोआपच दुर्लक्ष होईल. म्हणून अर्जुना ज्यावेळी ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक आहे त्यावेळी ते कोणतीही अपेक्षा न करता करण्याला फार महत्त्व आहे मात्र त्यासाठी मोहाच्या आकर्षणातून बाहेर येणे आवश्यक आहे.
क्रमश: