कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुचाकीवर विरुद्ध दिशेने बसून जीवघेणी सवारी

12:53 PM Sep 09, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

चिपळूण :

Advertisement

शहर व ग्रामीण भागात दुचाकीवर विरुद्ध दिशेने बसून प्रवास करण्याची जीवघेणी हौस तरुण-तरुणींबरोबरच लहान मुलांमध्येही वाढीस लागल्याचे चित्र पहावयास मिळते. काही पालक निष्काळजीपणे आपल्या मुलांना मागील सीटवर विरुद्ध दिशेने बसवून दुचाकी चालवतात. या प्रकारामुळे मुलांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे यात प्रामुख्याने अधिकाधिक सुज्ञ आणि सुशिक्षित पालकांचा समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Advertisement

प्रवासाच्यादृष्टीने वाहतूक नियमांचा विचार करता दुचाकीवर प्रवास करतेवेळी प्रवाशाने व्यवस्थित बसणे, हेल्मेट परिधान करणे सर्वात महत्वाचे तसेच बंधनकारक आहे. असे असले तरी त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जात आहे. शिवाय बसण्याबाबतही नीट काळजी घेतली जात नाही. यात प्रामुख्याने दुचाकीवर व्यवस्थित बसण्याऐवजी विरुद्ध दिशेने बसून प्रवास करण्याचा प्रकार सध्या वाढीस लागला आहे.

हा प्रकार पालक विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करतेवेळी अनेकदा दिसतो. तसे पाहिल्यास लहान मुले दुचाकीवर बसल्यानंतर व्यवस्थित बसण्याऐवजी विरुद्ध दिशेने बसण्याचा हट्ट करतात. तो पूर्ण करण्यासाठी पालकही निष्काळजीपणे त्या पाल्यास उलटे बसवून बेपर्वाईने प्रवास करतात. त्यातून मुलांना आनंद मिळतो. मात्र उलटे बसल्यामुळे मुलांच्या हाताला, पायाला आधार नसतो. शिवाय नीटपणे न बसल्यामुळे कॅरिअर पकडणे देखील अवघड असते. ही बालके रस्त्यावर धावणारी इतर वाहने, दुकाने बघण्यात गुंतलेली असतात.

अशावेळी रस्त्यावरून प्रवास करताना एखादेवेळेस अचानक ब्रेक लावल्यास किंवा वाहन घसरल्यास गंभीर अपघात घडू शकतो. पाल्याच्या हट्टापायी निष्काळजीपणे प्रवास जीवावरही बेतू शकतो.

सद्यस्थितीतील खड्डेमय रस्त्यावरून असा प्रवास खूपच धोकादायक ठरतो. मुलांचं आयुष्य मौल्यवान आहे. त्यांचा जीव धोक्यात घालून वाहन चालवणे हे निष्काळजीपणाचे कारण ठरेल. काही पालक मात्र आपल्या लहान पाल्यास दुचाकीवर विरुद्ध दिशेने बसवणे पूर्णपणे टाळतात. शिवाय त्या पाल्यास संभाव्य परिणामाची जाणीव करून देतात. त्यांची ही भूमिका खऱ्या अर्थाने स्वागतार्ह आहे. वाहतूक नियम लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाकडून देखील याविषयी जागृती केली जात असली तरी सध्याचे वाढीस लागलेले प्रकार लक्षात घेता त्यामध्ये सातत्य आणि अधिकाधिक कृतीची गरज आहे. वाहतूक नियम आणि पोलिसांची जागृती याकडे पालक कानाडोळा करत आहेत. मात्र एखादा अनर्थ घडण्यापूर्वी सुरक्षित प्रवासासाठी पालकांनी दक्षता घेणे आणि नियम पाळणे आवश्यक आहे. शाळांमधून देखील याबाबत सूचना दिल्या जात आहेत. हा धोकादायक प्रकार रोखायचा झाल्यास प्रत्येक पालकांमध्ये जागृती हवी, असे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले आहे.

हौसेसाठी छोटी बालके दुचाकीवर उलटे बसून प्रवास करण्याचे प्रमाण तेवढेसे नसले तरी यामध्ये निष्काळजीपणा नको. एखादा पाल्य दुचाकीवर उलटे बसवून प्रवास करण्याचा हट्ट धरत असेल तर त्यास वेळीच समज द्या. होणाऱ्या परिमाणाची जाणीव करून द्या, यातूनच निश्चितपणे त्या पाल्यास समज येईल.

                                                                                                                          - जयंत पवार, शिक्षक, चिपळूण

दुचाकी चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक आहे. काही बालके हौसेपाटी दुचाकीवर उलटे बसण्याचा पालकांकडे हट्ट धरतात. मात्र हा हट्ट एखादी दुर्दैवी घटना घडण्यास कारणीभूत ठरू शकते. यासाठी दुचाकीवर पाल्यास बसवताना व्यवस्थित बसवावे. याबाबत पालकही कायम जागृत हवेत.

                                                                                                    -फुलचंद मेंगडे, पोलीस निरीक्षक, चिपळूण

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article