For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिढा सुटला की नवा अध्याय ?

06:20 AM Aug 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
तिढा सुटला की नवा अध्याय
Advertisement

राज्यातील महायुती सरकार म्हणून तीन पक्षांनी एकत्र येत सत्तेची मोट बांधली असली तरी मंत्रीपद असो निवडणुकांचे जागावाटप असो कि पालकमंत्री पद असो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येऊन आता दोन वर्ष पूर्ण होतील,मात्र रायगड, नाशिक येथील पालकमंत्री पदाचा तिढा अखेर नागपंचमीच्या मुहुर्तावर सुटला आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी या दोन जिह्यात पालकमंत्री म्हणून कोण झेंडा फडकवणार ? हा एकच प्रश्न चर्चेत असायचा.

Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन होताच 18 जानेवारी 2025 रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. या यादीनुसार, नाशिकसाठी भाजपचे गिरीश महाजन तर रायगडसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची निवड करण्यात आली होती. मात्र, या घोषणेनंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी घेतलेली आक्रमक भूमिका तसेच नाशिकमध्येही मंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, अवघ्या 24 तासांत नाशिक आणि रायगडच्या पालक मंत्रिपदाबाबत घेतलेल्या निर्णयाला स्टे दिला. अखेर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्रीपदी शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले यांची निवड करण्यात आली आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पुस्तिकेवर गिरीश महाजन यांचा नाशिकचे पालकमंत्री म्हणून उल्लेख झाल्याने नाशिकचा तिढा सुटल्याचे संकेत दोन दिवस आधीच मिळाले. तर दुसरीकडे, 15 ऑगस्ट रोजी रायगडमध्ये भरत गोगावले यांनी पालकमंत्री म्हणून ध्वजारोहण केल्याने रायगडचा प्रश्नही एका वेगळ्या पद्धतीने मार्गी लागल्याचे म्हणता येईल. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट 2025 ला आदिती तटकरे यांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून ध्वजारोहण केले होते,यावेळी मात्र तटकरे यांच्या ऐवजी गोगावले यांना संधी मिळाल्याने महायुतीत शिवसेना शिंदे गटाचे वजन वाढल्याचे दिसले. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षावर वर्चस्व मिळविण्यासाठी सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे प्रयत्न करत असल्याची झालेली टीका, त्यानंतर सुनिल तटकरे यांना पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत दूर ठेवले जात असल्याची चर्चा होती. मात्र त्यानंतरही कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेतून होणाऱ्या विधानपरिषद निवडणूकीसाठी तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना संधी मिळणार की नाही? असा प्रश्न असताना तटकरे यांच्या पुत्राला पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली.

Advertisement

उध्दव ठाकरेंचे शिवसेनेचे उमेदवार बाळ माने यांनी माघार घेतल्याने अनिकेत तटकरे हे विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आले. दादांच्या नंतरही पक्षात आपले वर्चस्व असल्याचे तटकरे यांनी सिध्द केले, मात्र त्यानंतर तटकरे यांना लक्ष्य करण्यात आले.शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी तर थेट सुनिल तटकरे हे विश्वासघातकी असल्याचे बोलताना ते कोणाचेही होऊ शकत नाहीत, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई -गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्या दरम्यान तटकरे यांच्यावर टीका केली.ज्या राष्ट्रवादीत अजित दादा असताना दादांच्या नंतर तटकरे यांचा शब्द पक्षात प्रमाण होता, 2019 च्या उध्दव ठाकरेंच्या मंत्रीमंडळात आदिती तटकरे या एकमेव महिला मंत्री होत्या. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट 2025 ला आदिती तटकरे यांनीच पालकमंत्री म्हणून रायगडमध्ये ध्वजारोहण केले होते, मात्र यावेळी पहिल्यांदा तटकरे यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. या निमित्ताने एकनाथ शिंदे यांचे महायुतीतील वजन वाढत असताना, दुसरीकडे दादांच्या निधनानंतर तटकरे यांचे पक्षातील वजन कमी होत असल्याचे दिसत आहे. आता रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांची निवड झाल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

नाशिकमध्ये भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे दादा भुसे यांच्यातील दावेदारीचा प्रश्न होता, शिवाय राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांच्या नावाचीही चर्चा होत राहिली आहे. त्यामुळे नाशिकचा निर्णय हा केवळ एका मंत्र्याची नियुक्ती नसून भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यातील राजकीय वजनाचा प्रश्न बनला आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत शिंदे गटाचे म्हणजेच महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेंनी केलेला पराभव, त्यानंतर गोकुळ गीतेंचा झालेला शिवसेना पक्षप्रवेश  लक्षात घेता भाजपने नरमाईची भूमिका घेतली, तरीही भाजप आणि शिवसेनेतील सुप्तसंघर्ष कायम आहे.भाजपकडून कोणत्याही परिस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इतर कोणत्याही पक्षाला पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता कमीच होती, त्यानुसार भाजपच्या गिरीश महाजन यांना अखेर संधी मिळाली. रायगड आणि नाशिक या दोन जिह्यातील बहु प्रतिक्षित असलेला पालकमंत्री पदाचा तिढा संपलेला असताना, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे, अशी मागणी केली आहे.

विशेष म्हणजे, महायुती सरकारमध्ये भाजप हा सर्वात मोठा घटक असला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही आपला राजकीय प्रभाव कमी होऊ द्यायचा नाही. एकीकडे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते महायुतीतील एकजूट कायम असल्याचा संदेश देत असताना दुसरीकडे जिह्याच्या पातळीवर मात्र पदांसाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे वरच्या पातळीवरचे एकमत आणि जिह्याच्या पातळीवरील दावेदारी यामध्ये विरोधाभास निर्माण होत आहे.महायुतीतील प्रत्येक घटक पक्ष आपले राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. आज एका जिह्यात तडजोड झाली, उद्या दुसऱ्या जिह्यात नवी मागणी पुढे येऊ शकते. त्यामुळे पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला की महायुतीतील अंतर्गत संघर्षाला नवा अध्याय मिळाला, हा प्रश्न आगामी काळात अधिक महत्त्वाचा ठरेल.

प्रवीण काळे 

Advertisement
Tags :

.