कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिवस रंगबेरंगी फुलपाखरांचे

06:30 AM Oct 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जंगलांत आणि जेथे-जेथे सुरवंटांना खाद्य पुरविणाऱ्या वनस्पती असतात, तेथे फुलपाखरांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात. पश्चिम घाटातल्या जंगलात जेथे दलदलीचे प्रदेश आहेत, अशा ठिकाणी वर्षाच्या बारा महिने फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. केवळ पश्चिम घाटात आढळणारे ‘मलाबार ट्री निम्फ’ हे फुलपाखरू सदाहरित जंगलात हमखास पाहायला मिळते.

Advertisement

‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे इस्साक केहिमकर यांनी गेल्या कित्येक दशकांपासून फुलपाखरांच्या जीवन चक्राचा, पर्यावरणीय योगदानाचा अभ्यास करून सर्वसामान्यांपासून अलिप्त असलेले फुलपाखरांचे जग पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशात आणलेले आहे. कृष्णमेघ कुंटे यांनी तामिळनाडूच्या मधुमलाईच्या जंगलात आपल्या जीवनाला, फुलपाखरांवरच्या अभ्यासाला नवी दृष्टी मिळवून दिली. त्यांचे फुलपाखरांवरचे पुस्तक नव्या तऊणांना संशोधनाची नवी दृष्टी देणारे असेच आहे.

Advertisement

निसर्गाने आपणाला भरभरून दिलेले आहे परंतु निसर्गाचे दान स्वीकारण्यासाठी आपली झोळी फाटलेली असल्याने आपणाला त्यांचे महत्त्व सहसा उमजत नाही. नैसर्गिक जंगले नष्ट करून फुलपाखरांचा अधिवास संकटग्रस्त केला जात आहे. त्याऐवजी फुलपाखरांची कृत्रिमरित्या उद्याने, बगीचे, निर्माण केले जात आहेत. विकासापायी नवे महामार्ग, लोहमार्ग उभारले जात आहेत आणि त्यात दुर्मीळ गणल्या जाणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजाती नाहीशा होत आहेत. कर्नाटकात मंगळूरजवळ बेळुवाई येथे संमेलन शेट्टी या तऊणाने आपल्या जागेत फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारची रानफुले लावलेली आहेत आणि त्यामुळे त्याच्याठिकाणी सकाळ-संध्याकाळ विविधरंगी आणि विविध प्रजातीच्या फुलपाखरांचे थवेच्या-थवे पाहण्यासाठी केवळ कर्नाटकातूनच नव्हे तर देश-विदेशातून पर्यटक येतात. फुलपाखरांचे जीवनचक्र, त्याचे रंग-लावण्य सांगण्यासाठी संमेलन शेट्टीची धडपड प्रेरणादायी अशीच आहे.

फुलपाखरे हा निसर्गाचा अद्भूत चमत्कार आहे. ताणतणावाने जीवनातला आनंद हरवत चाललेल्या माणसाला फुलपाखरे आपल्या रंगाची मोहिनी घालतात आणि प्रसन्नतेचा शिडकावा करतात. निसर्गातला हा आनंद सोहळा अनुभवण्यासाठी आपण प्रत्येकाने भावतरल वृत्ती जोपासली तर तृप्तीचे अनुभव प्राप्त होऊ शकतील. महाराष्ट्र सरकारने आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पारपोलीला फुलपाखरांचे गाव म्हणून जाहीर केलेले आहे. या गावात सह्याद्रीतल्या पर्वतरांगांबरोबर पायथ्याशी भातशेती असून बारामाही वाहणारे झरे, नाले इथे असल्याने सदाहरित वृक्ष-वेलींमुळे इथे वर्षभर विविधरंगी आणि नाना प्रजातींच्या फुलपाखरांचे वैभव पाहायला मिळते.

फुलपाखरांच्या प्रजातींच्या पैदासीसाठी पोषक वनस्पती, पाणथळीच्या जागा, हवामान इथे असल्याकारणाने पारपोली ‘फुलपाखरांचा गाव’ म्हणून पर्यटक आणि वन्यजीव अभ्यासक आणि संशोधकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारच्या वन खात्याने डोळसपणे प्रयत्न करण्याची गरज होती. स्थानिक जनतेला सहभागी करून पर्यावरणस्नेही पक्षी निरीक्षण, फुलपाखरांचे दर्शन घडविणारी जंगल भ्रमंती यासारखे उपक्रम आयोजित करणे शक्य आहे. आवश्यक टॉयलेट, बाथरूम आणि राहण्यासाठी स्वच्छ आणि निर्मळ सुविधा गावातल्या स्थानिकांना सहभागी करून राबविणे शक्य आहे. फुलपाखरांचे गाव पारपोली येथे पर्यटक, अभ्यासक येतील, यासाठी निसर्ग संस्कार केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्त्न झालेले नाही.

कर्नाटक सरकारने वन खात्यातर्फे जोयडा येथे फुलपाखरांसाठी पुष्पोद्यान विकसित केलेले आहे परंतु हिवाळ्यानंतर फुलपाखरे इथे कशी नांदतील, यासाठी ठोसपणे प्रयत्न झालेले नाहीत. दक्षिण भारतीय उपखंडातले सर्वात मोठे ‘सदर्न बर्डविंग’ फुलपाखरू हिवाळ्यात इथे आवर्जून पाहायला मिळते. गोव्यात ‘मलाबार ट्री निम्फ’ला राज्य फुलपाखराचा दर्जा देण्यात आलेला आहे परंतु या फुलपाखरांच्या पैदासीसाठी आवश्यक वनस्पती आणि बारामाही वाहते पाणी असणारे सदाहरित जंगलक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असल्याने त्याचे दर्शन दुरापास्त ठरलेले आहे. एकेकाळी फुलपाखरांच्या सुरवंटाच्या पैदासीला पोषक अशा वृक्ष-वनस्पती असणारे नैसर्गिक अधिवास जेथे सुरक्षित असायचे तेथे हिवाळ्यात पट्टेरी वाघ, निळा वाघ आदी प्रजातींची फुलपाखरे हमखास पाहायला मिळायची. आज अशा जागा विकासाचे प्रकल्प कार्यान्वित करताना नष्ट होण्याचे प्रमाण लक्षणीय झालेले आहे.

जंगलक्षेत्र, जलस्रोत, पाणथळीच्या जागा, शेती-बागायतीच्या जमिनी, जैविक संपत्तीचे वैभव मिरविणारी पठारे वगळून अन्य जमिनीत पर्यावरणीय संकेतांचे पालन करून पर्यावरणीय पर्यटनाचे प्रकल्प कसे यशस्वीपणे लोक सहभागातून राबविता येतात, त्याचा आराखडा सरकारकडे नसतो आणि त्यामुळे विकासाच्या नावाखाली येऊ घातलेले प्रकल्प वादग्रस्त ठरत असतात. सरकारकडे यापूर्वी पर्यावरणीय पर्यटन राबविण्यासाठी जेथे-जेथे पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्यांचाच वापर होत नसल्याचे स्पष्ट झालेले आहे.

गोव्यात डॉ. ज्योती आणि यशोदन हेबळेकर यांनी कुळागरांनी नटलेल्या फोंड्यातल्या पिसगाळ येथे फुलपाखरांचे संवर्धन आणि संरक्षण करणारा जो प्रकल्प कार्यान्वित केलेला आहे, त्याला मुद्दाम भेट देण्यासाठी देश-विदेशातले पर्यटक येतात. काणकोणातील खोतीगाव अभयारण्याच्या हत्ती पावल येथे वन खात्याने फुलपाखरांच्या पैदासीसाठी आवश्यक फुलझाडे उद्यानात लावल्याने येथे हिवाळ्यात होणारे विविधरंगी फुलपाखरांचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक, विद्यार्थी, संशोधक इथे भेट देत असतात. हिमालयाच्या पर्वतरांगात वसलेल्या वनक्षेत्रास फुलपाखरांचे होणारे दर्शन नेत्रसुखद असून, त्यासाठी पर्यटक त्यांचे निरीक्षण करण्यास भेट देतात.

काही पक्षी, सरपटणारे आणि उभयचर प्राणी यांना अन्न पुरविण्याचे कार्य फुलपाखरे करतात त्याचप्रमाणे परागीकरणाच्या प्रक्रियेत फुलपाखरे महत्त्वाचे योगदान देतात आणि त्यामुळे त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी पोषक नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. जंगलाच्या सान्निध्यात जेथे बारामाही वाहणारे जलस्रोत आहेत, तेथे फुलपाखरांच्या पैदासीसाठी पुष्पोद्यान उभारून शाश्वतरित्या पर्यावरणीय पर्यटनाचे प्रकल्प राबविणे शक्य आहे.

- राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article