रोहयो महिलांकडून ‘गावासाठी एक दिवस’ उपक्रम
श्रमदानातून सुळगा (हिं.) येथे स्वच्छता मोहीम राबविल्याने परिसरातून महिलावर्गाचे कौतुक : इतर गावांकडून अनुकरणाची गरज
वार्ताहर/उचगाव
सुळगा (हिं.)येथील रोजगार हमी योजनेअंतर्गत आठवडाभर पगारावरती काम करणाऱ्या महिलांनी एक दिवस मोफत श्रमदान गावाच्या स्वच्छतेसाठी, सुदृढ जनतेच्या आरोग्यासाठी खर्ची घातल्याने परिसरातील जनतेतून या गावातील महिलावर्गाचे अभिनंदन करण्यात येत आहे. अशा या उपक्रमाचे अनुकरण तालुक्यातील इतर गावातील सर्व महिलांनी ‘गावासाठी एक दिवस’ ही संकल्पना राबवली तर खऱ्या अर्थाने गावाची स्वच्छता होऊन आरोग्यसंपन्न नागरिक आणि गाव निर्माण होईल. सुळगा (हिं.) येथील रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या जवळपास 400 महिला रविवारी सकाळी आठ वाजता हातामध्ये खुरपी, कुदळ-पावडे, बुट्ट्या हे साहित्य घेऊन गावाच्या स्वच्छतेसाठी त्यांनी रविवारी ही मोहीम राबवली.
गावातील लक्ष्मी गल्ली, मारुती गल्ली, मरगाई गल्ली, शंकर गल्ली, देशपांडे कॉलनी, ब्रह्मलिंग गल्ली, गणपत गल्ली, पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा परिसर, प्राथमिक-माध्यमिक शाळांचा परिसर, बेळगाव-वेंगुर्ले मार्ग या सर्व भागात त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी गटारींची स्वच्छता, गटारीच्या दुतर्फा वाढलेले रान, केरकचरा, रस्त्यावरती पडलेला चिखल, घाण तसेच पाण्याच्या टाकीसभोवती जिन्यावरील संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता मोहिममध्ये गावातील 400 महिलांनी सहभाग दर्शवला. रोजगार हमी रोजगार योजनेअंतर्गत शासनाकडून त्यांना पगार मिळतो. मात्र ‘एक दिवस गावासाठी’ ही संकल्पना त्यांनी राबविण्याचे ठरवले आणि या योजनेतील जे गट आहेत ते सर्व गट एकत्र आले.
आणि त्यांनी ठरवले की जेव्हा आपले गाव स्वच्छ असेल, आपले घर स्वच्छ असेल, अंगण स्वच्छ असेल त्याच वेळेला आपले आरोग्यही चांगले सुदृढ राहू शकते. यासाठी आपण सर्व महिला या गावाच्या स्वच्छतेसाठी एक दिवस मोफत देऊया, असे सर्वांनी ठरवून रविवारी ही स्वच्छता मोहीम राबवण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला. आणि गावाची स्वच्छता करून गाव लखलखीत करून सोडले. यामुळे गावात आनंदाचे वातावरण पसरल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते. या महिलांच्या कामगिरीबद्दल आणि राबवलेल्या ‘एक दिवस गावासाठी’ या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांमधून त्यांचे भरभरून कौतुक करण्यात येत होते.
मंगळवार-बुधवार लक्ष्मीदेवी-मरगाई देवीचा वार्षिकोत्सव
सुळगा (हिं.)या गावामध्ये मंगळवार दि. 10 आणि बुधवार दि. 11 या दोन दिवशी लक्ष्मीदेवीचा वाढदिवस आणि मरगाई देवीचा गोंधळ-यात्रा असा वार्षिकोत्सव साजरा केला जाणार आहे. या काळात बेळगाव तालुक्यातील अनेक पै पाहुणे, मित्रमंडळी या उत्सवानिमित्त गावामध्ये घरोघरी येत असतात. अशावेळी गावाची, घराची स्वच्छत ही तितकीच महत्त्वाची असल्याचे मत या महिलावर्गांनी दै. ‘तरुण भारत’च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. आणि म्हणून आम्ही एक दिवस गावाची स्वच्छता आरोग्यासाठी ही स्वच्छता मोहीम संकल्पना राबवत गावाची स्वच्छताही या यात्रोत्सवाच्या निमित्ताने केली जात असल्याचे सांगितले.