For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एक संस्कृती आता नष्ट होणार

06:19 AM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
एक संस्कृती आता नष्ट होणार
Advertisement

इराणवर निर्णायक हल्ला करण्याचा अमेरिकेचा इशारा, करार करण्याचा कालावधी पहाटेपर्यंत

Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

‘शांतता करार करण्यासाठी आणि होर्मुझची सामुद्रधुनी मुक्त करण्यासाठी आम्ही इराणला दिलेला कालावधी आता संपत आला आहे. तो संपण्याच्या आत इराणने शांततेसाठी योग्य ते पाऊल उचलले नाही, तर एका रात्रीत एक संस्कृती नष्ट होईल,’ असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे. अमेरिकेने दिलेला कालावधी भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे तीन वाजता संपत आहे.

Advertisement

त्यानंतर डोनाल्ड ट्रंप इराणवर निर्णायक हल्ला करण्याचा आदेश देतील, अशी शक्यता आहे. इराणची वीजनिर्मिती केंद्रे आणि पाणीपुरवठा व्यवस्थेवरही हल्ले होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास अत्यावश्यक सेवांची प्रचंड कमतरता इराणमध्ये निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे अमेरिकेने इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ला केल्यास मोठा विनाश होऊ शकतो. अमेरिकेने आपली विशेष घातक क्षेपणास्त्रेही सज्ज ठेवली आहेत. त्यामुळे या युद्धाचा परमोच्च क्षण लवकरच येऊ शकतो, अशी स्थिती आहे. सध्या सारे जग अमेरिकेच्या पुढच्या हालचालींकडे लक्ष ठेवून आहे.

मला ते नको आहे, पण...

इराणची संस्कृती नष्ट करण्याची अमेरिकेची क्षमता आहे. कदाचित एका रात्रीत अमेरिकेला हे करावे लागेल. तसे करण्याची आमची इच्छा नाही. तथापि, इराणने आपला हट्टाग्रह सोडला नाही, तर मात्र, तसे होईल. इराणचे जुनाट आणि कट्टर धार्मिक विचारांचे प्रशासकीय नेते आम्ही संपविले आहेत. आता इराणचे प्रशासन नवविचारांच्या, कमी धर्मवादी आणि तरुण नेत्यांच्या हाती येण्याची शक्यता आहे. कदाचित, या युद्धाचे पर्यवसान इराणमध्ये क्रांतीकारक परिवर्तन घडविण्यात होईल, असेही प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या संदेशात केले.

आजची रात्र ठरेल अविस्मरणीय

जगाच्या प्रदीर्घ आणि जटील इतिहासात कदाचित आजची मध्यरात्र, अविस्मरणीय ठरण्याची शक्यता आहे. इराणमध्ये तेथील धर्मांध प्रशासनांनी आतापर्यंत खंडणी वसुली, भ्रष्टाचार आणि रक्तपात घडविण्यापलिकडे काहीही पेलेले नाही. गेल्या 47 वर्षांचा हा इराणचा रक्तरंजित इतिहास आम्ही आता संपविणार आहोत. इराणच्या भल्यासाठी हे होत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

खार्ग बेटावर प्रचंड हल्ला

शांतता करारासाठी दिलेला कालावधी संपण्याच्या आतच अमेरिकेने इराणसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या ‘खार्ग’ बेटावर जोरदार हल्ले केले आहेत. या बेटावरील तेलाच्या निर्यातीची व्यवस्था या हल्ल्यांमध्ये उध्वस्त झाल्याचे वृत्त आहे. इराणने मोठी हानी झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला असला, तर हल्ल्याचे वृत्त मान्य केले आहे. अमेरिकेचा सूड घेण्याचा निर्धार इराणच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे. या हल्ल्यात इस्रायलच्या विमानांनीही भाग घेतला होता. या सततच्या बाँबवर्षावामुळे या बेटाची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.

इराणचा इस्रायलवर हल्ला

मंगळवारी रात्री इराणने इस्रायलवर मोठा हल्ला केल्याचे वृत्त आहे. खार्ग बेटावरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा दावा इराणने केला. इस्रायलवर आठ क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. मात्र, सर्व क्षेपणास्त्रे नियोजित स्थळी पोहचू शकलेली नाहीत. दोन क्षेपणास्त्रे मात्र आदळल्याने इस्रायलच्या काही भागांमध्ये प्रचंड स्फोट झाले. नागरीकांनी तळघरांमध्ये आश्रय घेतला. या हल्ल्यामध्ये जीवीत हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, काही इमारतींची हानी झाली आहे. अमेरिकेने हल्ला करण्यापूर्वीच इराणने हा हल्ला केल्याने इराणही युद्ध थांबविण्याच्या मन:स्थितीत नाही, हे स्पष्ट होते, असे तज्ञांचे मत आहे.

इराणवर कोसळणार ‘कयामत’ ?

ड बुधवारी पहाटेपर्यंतचा इरासासाठी अंतिम कालावधी. त्यानंतर निर्दय हल्ला

ड बुधवारच्या दिवस इराणसाठी काळा दिवस ठरणार : अमेरिकेने दिला इशारा

ड अंतिम कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच इराणने इस्रायलवर डागली क्षेपणास्त्रे

ड आजच्या हल्ल्यानंतर इराणला उभे राहण्यासाठी लागतील 20 वर्षे : ट्रंप

Advertisement
Tags :

.