तळवडे नंबर १ शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा
न्हावेली / वार्ताहर
नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय बालकला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात तळवडे नंबर नऊ शाळेच्या कुमार यश संजय परब व कुमारी गौरांगी समीर रानगावकर यांनी ज्ञानी मी होणार लहान गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.गेली दोन वर्ष तळवडे नंबर १ शाळेने ज्ञानी मी होणार स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले होते. यावर्षी शाळेने सुरुवातीपासूनच ज्ञानी मी होणार स्पर्धेची तयारी चालू ठेवली होती. यासाठी वर्गशिक्षक श्री दिगंबर तळणकर सर व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा सावंत मॅडम यांनी मेहनत घेतली व मुलांना मार्गदर्शन केले. चालू वर्षी शाळेने विविध शासकीय उपक्रमातदेखील दैदीप्यमान असे यश पटकावले आहे.यामध्ये "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"तालुकास्तर द्वितीय क्रमांक, माझी शाळा माझी परसबाग उपक्रमात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच नुकतेच जिल्हास्तरीय परसबाग मूल्यांकन समितीने शाळेला भेट देऊन परसबागेचे मूल्यांकन केले आहे व शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले आहे. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामेश्वर मालवणकर, उपाध्यक्षा उर्मिला लोके, शिक्षण तज्ञ प्रसाद गावडे, तळवडे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. पावसकर सर व पालक वर्गाने विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.