आईला उदरनिर्वाह भत्ता न देणाऱ्यावर गुन्हा! जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
रत्नागिरी प्रतिनिधी
आईला उदरनिर्वाह भत्ता न देणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. राजू उर्फ राजेंद्र विठ्ठल तळेकर (रा. मिरजोळे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार शहर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभा विठ्ठल तळेकर (रा. मिरजोळे रत्नागिरी) यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे आपल्याला मुलाकडून उदरनिर्वाह भत्ता मिळावा, यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून १४ फेब्रुवारी २०२४ पासून मुलगा राजेंद्र तळेकर याला आई शोभा तळेकर यांना दरमहा तीन हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता देण्याचे आदेश दिले. दरम्यान मुलाकडून आपल्याला पैसे मिळत नसल्याचे शोभा तळेकर यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशाची अवमानता केल्यापकरणी राजेंद्र तळेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी राजेंद्रविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.