श्वासाशिवाय जिवंत राहू शकणारा जीव
जगातील सर्वात रहस्यमय जीव
जगात असे अनेक जीव आढळून येतात, जे लोकांसाठी रहस्य असतात. तसेच काही जीवांबद्दल कळल्यावर लोक अचंबित होतात. असाच एक जीव श्वसनाशिवाय जिवंत राहू शकतो. वैज्ञानिकांनी काही वर्षांपूर्वी या रहस्यमय जीवाचा शोध लावला होता. हे अनोखे वैशिष्ट्या असलेला हा जगातील पहिला जीव आहे. हा जीव जेलीफिशप्रमाणे दिसतो आणि बहुपेशीय परजीवी आहे. यात मायट्रोकॉन्ड्रियल जीनोम नाही. कुठल्याही जीवला श्वास घेण्यासाठी मायट्रोकॉन्ड्रियल जीनोम अत्यंत आवश्यक असतो. याचमुळे या परजीवीला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासत नाही. इस्रायलच्या तेल अवीव युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या टीमने 2020 मध्ये या अद्भूत आणि रहस्यमय परजीवीचा शोध लावला होता.
संशोधकांनुसार हा परजीवी माशांपासून ऊर्जा प्राप्त करतो. परंतु यादरम्यान तो त्यांना कुठल्याही प्रकारे नुकसान पोहोचवत नाही. खास बाब म्हणजे मासे देखील या परजीवीला नुकसान पोहोचवत नाहीत. हा परजीवी साल्मन फिशमध्ये आढळून येतो आणि हा मासा जिवंत असेपर्यंतच जिवंत राहतो. या जीवाचे शास्त्राrय नाव हेन्नीगुया साल्मिनीकोला आहे. हा जीव माणूस किंवा अन्य जीवांसाठी कुठल्याही प्रकारे नुकसानदायक नाही. परंतु अशाप्रकारचा जीव पृथ्वीवर विकसित कसा झाला हे रहस्य अद्याप कायम असल्याचे संशोधनाचे प्रमुख डयाना याहलोमी यांनी सांगितले आहे.
संशोधनादरम्यान वैज्ञानिकांनी या परजीवीला फ्लोरेसेंस मायक्रोस्कोपद्वारे पाहिले, ज्यात त्यांना मायटोकॉन्ड्रियल डीएनए दिसून आला नाही. यानंतर या जीवाला जगण्यासाठी श्वास घेणे आवश्यक नसल्याची स्थिती स्पष्ट झाली. परंतु 2010 मध्ये देखील इटलीच्या संशोधकांना अशाचप्रकारचा एक जीव मिळाला होता, ज्यात स्पष्टपणे मायटोकॉन्ड्रियल डीएनए दिसून आला नव्हता. त्याच्या ऊर्जेचा स्रोत हायड्रोजन सल्फाइड होता. परंतु नव्याने मिळालेल्या या जीवाला हायड्रोजन सल्फाइडची देखील गरज नाही.