वाशिष्ठी नदीत दाम्पत्याने मारली उडी
चिपळूण :
शहरातील गांधारेश्वर पुलावरून एका दाम्पत्याने वाशिष्ठी नदीत उडी मारल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. येथे तैनात असलेल्या एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत एनडीआरएफकडून दाम्पत्याची शोधमोहीम सुरू होती.
मात्र या दोघांचाही शोध लागलेला नाही. या दाम्पत्याचा मे महिन्यात विवाह झालेला असून पतीचा चिपळूण शहरात मोबाईल दुरुस्ती-विक्रीचा व्यवसाय आहे.
नीलेश आहिरे (26), अश्विनी नीलेश आहिरे (19, मुळ-धुळे, सध्या-पाग) असे नदीत बेपत्ता झालेल्यांची नावे आहे. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार नीलेश व अश्विनी हे मुळचे धुळे जिह्यातील आहेत. ते काही महिन्यांपासून शहरातील पाग येथे वास्तव्यास होते. बुधवारी अश्विनीने प्रथम गांधारेश्वर पुलावरून नदीत उडी मारली. उडी मारताना पाहिलेल्या काहींनी पाण्यात ती बुडतानाचा व्हिडीओ देखील काढला आहे. त्यानंतर नीलेश यानेदेखील पुलावरून नदीत उडी मारली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण नीलेश याची दुचाकी चावीसह पुलावर उभी होती.
दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळताच प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, तहसीलदार प्रवीण लोकरे, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, नगर परिषद प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर येथे पावसाळ्यासाठी तैनात असलेल्या एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले. एनडीआरएफ पथक प्रमुख प्रमोद राय हे आपल्या जवानांसह घटनास्थळी दाखल झाले. नीलेश, अश्विनी या दोघांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ पथकाच्या चार बोटी वाशिष्ठी पाण्यात सोडण्यात आल्या. त्या सहाय्याने त्यांची शोधमोहीम राबवण्यात आली. त्यापैकी तीन बोटी गांधारेश्वर पासून पुढे पेठमापपर्यंत नेण्यात आल्या. तर नदीकिनारी देखील त्याचा शोध घेण्यात आला. मात्र सायंकाळपर्यंत कोठेही ते सापडले नव्हते.
- पतीचा मोबाईल दुरुस्ती-विक्रीचा व्यवसाय
नीलेश व अश्विनी यांचे मे महिन्यात लग्न झाले आहे. नीलेश हा काही वर्षापासून मोबाईल दुरुस्ती, विक्रीच्या व्यवसायात कार्यरत आहे. ते दोघेजण काही महिन्यांपासून शहरातील पाग येथे भाड्याने वास्तव्यास आहेत. नीलेश व अश्विनी या दोघांनी कोणत्या कारणातून वाशिष्ठी नदीत उडी मारली याचा उलगडा झालेला नाही. याबाबत चिपळूण पोलीस पोलीस ठाण्यात ते दोघेजण बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर मोबाईल व्यावसायिकांसह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वाशिष्ठी पुलावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.