For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंदूकधारी बालकांचा देश

06:52 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
बंदूकधारी बालकांचा देश
Advertisement

फिनलंड हा जगातला सर्वात आनंदी देश असं जाहीर झालं. त्या पाठोपाठ फिनलंडच्या राजधानीतील एका शाळेत बारा वर्षांच्या शाळकरी मुलाने शाळेत गोळीबार केला. त्यात एक विद्यार्थी मृत झाला आणि दोन विद्यार्थी जखमी झाले. आपल्या नातेवाईकांची हँडगन त्याने वापरल्याचे लक्षात आले. यापूर्वीही 2007 आणि 2008 मध्ये दोन शाळांमध्ये विद्यार्थ्यांनीच बंदुकीचा वापर करत वीसजणांचा जीव घेतला होता. एवढ्याशा फिनलंडमध्ये 4,30,000 लोकांकडे बंदुकीचा परवाना आहे.

Advertisement

अमेरिकेत तर शालेय हिंसाचाराने थैमान मांडले आहे. आपल्या देशापासून खूप दूर असलेल्या देशांमधील या घटना आहेत. त्यामुळे त्या संबंधी आपल्याला चिंता आणि विचार करण्याची काहीच गरज नाही, असा विचार जगातल्या कोणत्याही देशाच्या लोकांना परवडणारा नाही. शिक्षण व्यवस्थेला तर यासंबंधी विचार करावाच लागेल. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांनी एकदा म्हटलं होतं की, आपल्याला आपल्या पिढीला भविष्यातील अशा समस्यांचा सामना करण्याची सिद्धता करावी लागेल, ज्या समस्या आज कुठेच दिसत नाहीत. फिनलंडच्या घटनेनंतर डॉ. कलामांच्या इशाऱ्याची खुपच तीव्रतेने आठवण होते.

पाश्चात्यांच्या अनेक अनिष्ट गोष्टी आपल्या घरात पोचल्या आहेत, तर काही उंबरठ्यावर आहेत. 2022 मध्ये अमेरिकी युवक साल्वादोर रामोसने आपल्या अठराव्या वाढदिवशी दोन एआर 15-टाईप ऑटोमेटिक रायफल आणि 300 गोळ्या खरेदी केल्या आणि टेक्सासच्या उबाल्डे भागातील शाळेत त्याने बेछुट गोळीबार करत 19 मुलं आणि 2 शिक्षकांची हत्या केली. ही 19 मुलं दुसरी, तिसरी आणि चौथीत शिकणारी, सात ते दहा वर्षे या वयोगटातील होती. 2018 मध्ये तीन महिन्यात शाळेत गोळीबारच्या 19 घटना घडल्या होत्या. फेब्रुवारी 2018 मध्ये फ्लोरीडाच्या शाळेत सतरा मुलांची हत्या झाली. जगाला अत्याधूनिक शस्त्रास्त्रs पुरवणाऱ्या अमेरिकेला जे पेरले जाते तेच भरपूर प्रमाणात उगवत असते याची प्रचिती येत आहे. त्यातून काही धडा घेण्याचं मात्र नाव नाही.

Advertisement

एप्रिल 1999 मध्ये कोलोरेडोच्या शाळेत बारा विद्यार्थी आणि एक शिक्षक मारला गेला. मार्च 2005 मध्ये रेड लेक सिनियर हायस्कूल, मिनिसोटात सात मुलं मारली गेली. 2006 मध्ये वेस्ट जिकेल मालून्स शाळेत पाच विद्यार्थी मृत्यूमुखी पडले. एप्रिल 2007 मध्ये ब्लैल्सबर्गच्या बर्जीनिया कॉलेजमध्ये 32 जणांचा बळी व 24 जण जखमी झाले, डिसेंबर 2012 मध्ये सैंडी हूक विद्यालयात 20 मुलांसमवेत अन्य 26 जणांची हत्या झाली. 2014 मेरी सबिले पिलचूक शाळेत चारजण मारले गेले. ऑक्टोबर 2015 मध्ये ओरेगॉन येथील युएमपीक्यूयुए कॉलेजमध्ये नऊ जणांची हत्या झाली.

अमेरिकेतील राजकारणी आणि सामान्य जनता शस्त्र संबंधी कायद्यात परिवर्तन व्हायला पाहिजे अशा मताचे नाहीत. यासंबंधी कडक कायदा करण्याचं समर्थन फक्त 52 टक्के लोकांनी केलं आहे. 11 टक्के लोकांना तर हा कायदा आणखीही ढील व्हायला हवा असं वाटतं ही अधिक धक्कादायक बाब आहे. स्मॉल आर्म्स सर्वेनुसार 2018 मध्ये अमेरिकेत 39 कोटी बंदूका लोकांकडे आहेत. प्यू रिसर्च सेंटरनुसार दर दहा अमेरिकन लोकांपैकी तीन जणांकडे शस्त्रs आहेत. याच सेंटरच्या पाहणीनुसार बंदूधारक बंदूक बाळगणे आपले व्यक्तीगत स्वातंत्र्य मानतात. याच्याशी तडजोड करायला बहुसंख्य लोक तयार नाहीत. नॅशनल रायफल असोसिएशन या अमेरिकेतील शक्तीशाली संस्थेचाही बंदूक नियंत्रणाला विरोध आहे.

आत्मरक्षणासाठी अमेरिकेची राज्यघटना आणि सर्वोच्च न्यायालय नागरिकांना बंदूक बाळगण्याचं स्वातंत्र्य देते. बॉल स्ट जर्नलच्या संपादकीयात अमेरिका हा एकमेव देश आहे जेथे कायद्याने रायफल्स, शॉटगन्स आणि हँडगन्स बाळगणारे मोठ्या संख्येने आहेत. ते त्यांना भूषणही वाटते. जीव वाचविण्यासाठी शस्त्र बाळगणे, आणि शस्त्र हातात सहजपणे आल्यामुळे दुसऱ्याचा जीव घेणे हे एक दृष्टचक्र आहे. त्यामुळे हे दृष्टचक्र थांबण्याची लक्षणं दिसतं नाहीत आणि असं हे जीवघेणं दृष्टचक्र थांबवणंही आता कठीण आहे.

शस्त्रास्त्र निर्माण करण्याचा वेग अमेरिकेत झपाट्याने वाढत आहे. पाच वर्षात दुपटीने वाढ होणे असे लक्षात आले आहे. 89 टक्के अमेरिकन नागरिकांकडे अशी प्राणघातक शस्त्रs आहेत. त्यामुळे इतर देशांपेक्षा अमेरिकेत अशा गुन्ह्यांची संख्या पंचवीस पट अधिक आहे. ही शस्त्रs उत्पादित करणारी लॉबीही खूप बलाढ्या अशी प्रभावी आहे. या लॉबीचा अर्थनीती आणि परराष्ट्र नीतीवरही बराच प्रभाव आहे. या लोकांचं लक्ष केवळ आपल्याला किती आणि कसा फायदा होईल यावरच असतं. जगात जी अनेक युद्ध होतात त्या मागेही शस्त्रास्त्र निर्माण करणाऱ्या आणि त्यांची विक्री करणाऱ्या लोकांचा हात मोठ्या प्रमाणात असतो. त्यांना कोणता देश जिंकतो आणि कोणता देश हरतो या पेक्षा आपली शस्त्रं कशी खपतील याचीच चिंता आहे.

अमेरिकेत तर खेळणी जेवढ्या सहजपणे उपलब्ध होतात तितक्या सुलभपणे गन्सही मिळू शकतात.  हे बाल अपराधी मानसिक रुग्ण असतातच असंही नाही असं पाहणीत लक्षात आलं आहे. अमेरिकन समाजजीवन, चंगळवाद, अतिरेकी भोगप्रदान जीवनशैली, मुल्यांची घसरण अशी अनेकविध कारणं आहेत.

खूप वर्षांपूर्वी डॉ. उषादेवी कोल्हटकरांचं ‘अमेरिका किती छोटी, किती मोठी’ हे पुस्तक वाचनात आलं होतं. त्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत एक पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या. आपल्या वास्तव्यात त्यांनी अमेरिकन समाज, कुटुंबव्यवस्था यांचं बारकाईने अवलोकन केलं. ते अनुभवच त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. बरे वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव आहेत. ते वाचत असताना अमेरिकेचं एक चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं होतं. त्यात हत्याकांडाच्या घटना नव्हत्या. तरीही मूल्यांची पडझड खूप मोठ्या प्रमाणात झाल्याचे लक्षात येतच होतं.

जगातल्या अनेक लोकांना अमेरिकेसंबंधी खूप आकर्षण आहे. भारतातल्या मंडळींना तर जरा विशेष आकर्षण. अमेरिकेचं ‘ग्रीन कार्ड’ मिळणं म्हणजे तर जीवंतपणी स्वर्गप्राप्तीच. त्यांचं अनुकरण करण्याकडे प्रचंड ओढ. दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टी जरूर घ्याव्यात, पण ते अंधानुकरण असू नये. डोळ्यांना झापडं बांधू नयेत हेही खरं. पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी एक महत्त्वाची सूचना केली होती. ‘युगानुकूल आणि देशानुकूल,’ असे दोन शब्द त्यांनी सुचवले होते. याची जाण ठेवली तर उद्ध्वस्त होण्याची भीती नाही.

आज देशादेशांमधल्या सीमा धूसर होत आहे. सगळं जगच एक ‘ग्लोबल व्हीलेज’ झालं आहे. कोणत्याही देशातील बऱ्या वाईट पद्धती, परंपरा जीवनशैली दुसऱ्या देशात प्रवेश करणारच. त्यांना रोखता येणार नाही. एका देशाचं सैन्य दुसऱ्या देशात घुसू शकत नाही. एका देशाचे नागरिक सर्व सोपस्कार पूर्ण करूनच दुसऱ्या देशात प्रवेश करू शकतात. पण सवयी, पद्धती, जीवनशैलीचा प्रवेश रोखणं खूप कठीण. अन्य कोणत्याही देशाचा, समाजाचा संपर्कच होऊ देणार नाही असंही आता शक्य नाही.

आपल्या कुटुंबात, समाजात अशा अनिष्ट प्रवृत्ती प्रवेश करणार नाही याची खबरदारी बाळगणंच आपल्या हातात आहे. त्यासाठी आपल्या मुल्यांवर आदर्शांवर अढळ श्रद्धा हवी आणि ‘नीर क्षीर विवेकबुद्धी’ शाबूत ठेवायला हवी. ंशिक्षण संस्थांसमोर हे एक मोठं आव्हान आहे.

- दिलीप बेतकेकर

Advertisement
Tags :

.