केवळ ‘विचारां’वर चालणार संगणक
हे कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचे किंवा एआयचे युग आहे. चमत्कार वाटाव्यात अशा काही घटना या तंत्रज्ञानामुळे घडू लागल्या आहेत. हे चांगले की वाईट, हे कळण्यासाठी काही काळ जावा लागणार आहे. मात्र, एआयचा उपयोग प्रत्येक क्षेत्रात वाढत असून जसजशी या तंत्रज्ञानात सुधारणा होत आहे, तसा त्याचा प्रवेश विविध क्षेत्रांमध्ये होत आहे. या तंत्रज्ञानामुळे संगणकातही मोठी क्रांती होणार आहे. सध्या संगणक चालविताना आपल्याला हाताच्या बोटांचा उपयोग करावा लागते. संगणकाचा कर्सर किंवा कीबोर्ड चालवूनच संगणकाला आज्ञा दिल्या जाऊ शकतात. भोबाईल किंवा तत्सम साधनांमध्ये बोटांचा स्पर्श पुरेसा असतो. पण तेव्हढा तरी करावाच लागतो. तथापि, आता असे संगणक निर्माण करण्यात आले आहेत, की जे केवळ आपल्या ‘विचारां’वर चालू शकतील. अशा संगणकांच्या निर्मितीत कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचे योगदान महत्वाचे आहे. या संगणकाला आदेश देण्याचे काम आपल्या मेंदूतील विचार करु शकतील अशी स्थिती आहे.
हा संगणक चालविण्यासाठी की बोर्ड किंवा माऊस या साधकांची आवश्यकताच लागणार नाही. मात्र, यासाठी आपल्याला आपल्या मेंदूत एक विशिष्ट प्रकारची ‘चिप’ एक सोपी शस्त्रक्रिया करुन बसवून घ्यावी लागणार आहे. ही चिप आपल्या मेंदूतील विचारांचे ग्रहण करुन ते आपल्या संगणकापर्यंत पोहचविणार आहे. त्यामुळे आपला संगणक आपल्याला हवी असणारी कामे अपोआप करणार आहे. जे लोक आपल्या शरीराच्या हालचाली योग्यरित्या करु शकत नाहीत, तसेच जे ‘दिव्यांग’ आहेत, त्यांच्यासाठी हा संगणक जणू वरदान ठरणार आहे. या संगणकाची निर्मिती अमेरिकेत केली जात असून ती ‘न्यूरालिंक’ कंपनीकडून केली जात आहे. ही कंपनी नेत्रदिव्यांगांना दृष्टी पुन्हा मिळवून देण्यासाठीही प्रयत्नशील आहे. त्यासाठी ‘ब्लाईंडसाईट’ नामक तंत्रज्ञान विकसीत केले जात असून तेही कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानावर आधारीत आहे. सूक्ष्म कॅमेऱ्यांच्या साहाय्याने टिपलेली दृष्ये नेत्रांच्या माध्यमातून मेंदूपर्यंत न पोहचविता ती थेट मेंदूपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था या तंत्रज्ञानामुळे होईल, असा संशोधकांचा विश्वास आहे. हे तंत्रज्ञान विकसीत झाल्यास जगभरातील नेत्रदिव्यांगांसाठी ते मोठे वरदानच असेल, असे संशोधकांचे मत आहे.
