शहरातील सुक्या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी बेळगुंदीतील कंपनी इच्छुक
महापालिकेकडून पडताळणी सुरू : सर्वसाधारण सभेतच होणार निर्णय
बेळगाव : शहरात निर्माण होणाऱ्या सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बेळगुंदी येथील ग्लोबल एनर्जी प्रा. लि. ही कंपनी पुढे सरसावली आहे. सुका कचरा देण्यासंदर्भात कंपनीकडून महानगरपालिकेला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याबाबत आरोग्य विभागाकडून पडताळणी केली जात असून यावर सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला जाणार असून त्यानंतरच सदर कंपनीला सुका कचरा द्यावा की नाही? त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत दररोज 120 टन ओला कचरा, 80 टन सुका कचरा आणि 60 टन मिश्रित कचरा तयार होतो. सदर कचऱ्याची महानगरपालिकेकडून उचल केल्यानंतर त्यावर तुरमुरी येथील घनकचरा प्रकल्पात प्रक्रिया केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून तुरमुरी येथील कचरा डेपोला ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांतून तीव्र विरोध केला जात आहे. कचरा डेपोसाठी पर्यायी जागेचा शोध घेतला जात असला तरीही अद्यापही जागा उपलब्ध झालेली नाही.
त्यामुळे तुरमुरी कचरा डेपोवरील कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. सुका कचरा जो सहजासहजी न कुजणारा (अविघटनशील) आणि रिसायकल करण्यायोग्य असतो. कागद, पुठ्ठे, वर्तमानपत्र, वह्या, खोके, पॅकेजींग साहित्य, प्लास्टीकच्या पिशव्या, बाटल्या, डबे, काचेच्या बाटल्या, बरण्या, फुटलेली काच, लोखंडी वस्तू, अॅल्युमिनियमचे डबे, पितळ, तांब्याची जुनी भांडी, जुने कपडे, रब्बर, थर्माकोल, फुटवेअर आदींचा सुक्या कचऱ्यामध्ये समावेश आहे. शहरात अशाप्रकारचा दररोज 80 टन कचरा तयार होतो. मात्र आता या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यासाठी बेळगुंदी येथील ग्लोबल एनर्जी प्रा. लि. कंपनी पुढे सरसावली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून महानगरपालिकेकडे सुका कचरा देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कंपनीने दिलेले अग्रीमेंटचे पडताळणी करण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरु आहे. सदर प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादर केला जाणार आहे. सदर कंपनीला सुका कचरा द्यावा की नाही हा निर्णय सर्वसाधारण सभेतच घेतला जाणार आहे.
महानगरपालिकेला चांगले उत्पन्न मिळणार
सुक्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करता येते. या प्रक्रियेला वेस्ट टू एनर्जी किंवा कचऱ्यापासून ऊर्जा प्रकल्प असेही म्हटले जाते. प्रथम कचऱ्यामधील धातू, काच या सारखे न जळणारे पदार्थ वेगळे केले जातात. उरलेला सुका कचरा उच्च तापमानावर जाळला जातो. कचरा जळाल्यामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेने पाण्याचे बॉयलरमध्ये वाफेत रुपांतर होते. ही उच्च दाबाची वाफ टर्बाईन फिरविते. ज्यामुळे जनरेटरद्वारे वीज तयार होते. पर्यावरणाला पूरक असा विजेचा नवीनच स्त्रोत मिळतो. भविष्यात सदर कंपनीला सुका कचरा देण्याचा निर्णय झाल्यास या माध्यमातून महानगरपालिकेला चांगले उत्पन्न मिळणार आहे.