मृत्यूप्रकरणी आनंद व्यक्त करणारा समुदाय
मूल जन्मल्यास असते दु:खाचे वातावरण
जगात असे अनेक समुदाय आहेत, जे शतकांपासून प्रथांचे पालन करत आले आहेत. लोक सर्वसाधारणपणे मूल जन्मल्यावर आनंद व्यक्त करतात, तर कुणाचा मृत्यू झाल्यास दु:खी होतात. परंतु एक समुदाय मुल जन्मल्यावर दु:ख आणि कुणाचा मृत्यू झाल्यास आनंद व्यक्त करतो. राजस्थानात राहणारा जिप्सी समुदाय विचित्र कारणासाठी ओळखला जातो.
राजस्थानात जवळपास 24 जिप्सी परिवार समूह आहेत. या समुदायाचे बहुतांश लोक निरक्षर असतात, या समुदायाची एक प्रथा त्याला इतरांपासून वेगळी करते. कुणाचा मृत्यू झाल्यावर आनंद व्यक्त करण्याची प्रथा या समुदायामध्ये आहे. या समुदायाचे लोक कुणी मृत्युमुखी पडला तर आनंद व्यक्त करतात आणि मुलाच्या जन्मानंतर दु:ख. अशा स्थितीत या समुदायातील एखादा सदस्य मृत्युमुखी पडला तर उर्वरित लोक नवे कपडे परिधान करतात, परस्परांना मिठाई भरवतात आणि मद्यपान करतात.
जिप्सी समुदायात कुणाचा मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह ढोलाच्या तालावर नाचत गात फिरविला जातो. मृताचे शरीर पूर्णपणे राखेत बदलत नाही तोवर हे लोक नाचत राहतात. संबंधितावर अंत्यसंस्कार झाल्यावर समुदायाचे उर्वरित लोक भोजनाचे आयोजन करतात. यादरम्यान सर्वजण मिळून मद्यपान करतात. या समुदायात सर्व लोक मद्याचे अत्यंत शौकिन असतात.
मृत्यू आपल्यासाठी एक महान संधी आहे, कारण मृत्यू आत्म्याला भौतिक स्वरुपात मुक्त करत असल्याचे या समुदायाच्या लोकांचे मानणे आहे. जीवन एक अभिशाप असून ते शिक्षेच्या स्वरुपात ईश्वराने आपल्याला दिले असल्याचे या समुदायाचे मानणे आहे.
जन्मानंतर दिला जातो शाप
या समुदायात एखाद्या घरात मूल जन्माला आले तर तेथे दु:ख व्यक्त केले जाते. त्यावेळी सर्वजण त्या मुलाला शाप देतात आणि त्यादिवशी घरात चूल पेटविली जात नाही. या समुदायाची मुले शाळेत नाहीत तसेच शिक्षणही घेत नाहीत. या समुदायाच्या महिलाच घर चालवित असतात.