अंत्यसंस्काराची अनोखी प्रथा पाळणारा समुदाय
भारताची विविधता केवळ भाषा, आहार किंवा वेशभूषेपर्यंत मर्यादित नाही. येथील अनेक समुदाय मृत्यूनंतरही अनोख्या प्रथा परंपरांचे पालन करतात. अरुणाचल प्रदेशातील मोनपा समुदायाची अंत्यसंस्काराची पद्धत सर्वात चकित करणारी आहे. बहुतांश समुदाय मृतदेहाला दफन किंवा त्यावर अग्निसंस्कार करतात. तर मोनपा समुदाय शरीराला 108 तुकड्यांमध्ये कापून नदीत माशांना खाऊ घालतात. याला ‘वॉटर बरियल“ किंवा जलसंस्कार म्हटले जाते. अंत्यसंस्काराची ही पद्धत वादग्रस्त आहे, परंतु या समुदायानुसार आत्म्याच्या मुक्तीची हीच योग्य पद्धत आहे.
शतकांपासूनची परंपरा
मोनपा समुदाय मुख्यकरून तवांग, वेस्ट कामेंग आणि ईस्ट कामेंग जिल्ह्यांमध्ये राहतो. हा बौद्ध धर्माला मानणारा समुदाय असून त्यांची संस्कृती तिबेटी बौद्ध परंपरांनी अत्यंत प्रभावित आहे. मोनपा समुदाय मृत्यूला अंत नव्हे तर नव्या प्रवासाची सुरुवात मानतो. शरीराला नष्ट करण्याऐवजी त्याला अन्य जीवांसाठी उपयोगी करण्याचा विचार याच प्रथेचा आधार आहे.
प्रथा कशी पार पडते?
मृतदेह प्रथम साफ केला जातो आणि बौद्ध मंत्रांचा जप केला जातो. मग एक विशेष व्यक्ती (सर्वसाधारणपणे बौद्ध लामा किंवा रिचुअल स्पेशलिस्ट) शरीराला ठीक 108 तुकड्यांमध्ये कापतो, 108 ही संख्या संसारिक आसक्तींना तोडण्याचे प्रतीक मानण्यात येते. तुकड्यांना नदी, सरोवर किंवा पवित्र जलाशयात नेत वाहिले जते. मासे आणि अन्य जीव या तुकड्यांना खातात. अशाप्रकारे शरीर निसर्गात परतते आणि मृत आत्म्याला मोक्ष मिळण्यास मदत मिळते असे मोनपा लोक मानतात. ही प्रक्रिया पर्यावरणाच्या अनुकूल देखील आहे, कारणत यात लाकडांची गरज भासत नाही तसेच जमीन खोदावी लागत नाही.
चित्रपटाची निर्मिती
समुदायाच्या या प्रथेवर 2021 मध्ये ‘वॉटर बरियल“ नावाचा चित्रपट निर्माण करण्यात आला होता. या चित्रपटाने 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन श्रेणीचा पुरस्कार मिळविला होता. चित्रपट मोनपा समुदायाच्या याच प्रथेवर आधारित होता.
108 तुकडे का?
बौद्ध दर्शनात 108 संख्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, याला संसारिक आसक्ती, क्लेश किंवा भ्रमांची संख्या मानण्यात येते. शरीराला तुकड्यांमध्ये विभागून मोनपा समुदाय मृताला या आसक्तींपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करतो. तसेच शरीराला व्यर्थ जाऊ देत नाही. माशांना ते खायला देत मृत शरीरही इतरांच्या कामी आल्याचे ते सांगतात.
तिबेटी प्रभाव
मोनपा समुदायाची ही परंपरा तिबेटच्या ‘स्काय बरियल“शी अत्यंत मिळतीजुळती आहे. तेथे मृतदेह पर्वतावर ठेवून गिधाडांना खायला दिला जातो. दोन्ही प्रथा बौद्ध विचारसरणीने प्रेरित आहेत, शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे. पर्वतीय भागात स्काय बरियल शक्य आहे, तर मोनपा क्षेत्रांमध्ये नद्या उपलब्ध असल्याने वॉटर बरियल प्रचलित आहे.