सूर्यकिरणाद्वारे वेळ सांगणारे घड्याळ
विज्ञानाचा अनोखा नमुना
प्रत्येक किल्ला, महाल आणि वारसास्थळांची एक विशेष ओळख असते आणि त्याचा एक महत्त्वपूर्ण इतिहास असतो. जंतर-मंतर देखील एक असाच ऐतिहासिक वारसा असून त्याचा इतिहास आणि विज्ञानाशी मोठा संबंध आहे. जयपूर येथील जंतर-मंतरची निर्मिती 1728 मध्ये सवाई जयसिंह यांनी करविली होती. हे जंतर-मंतर प्राचीन असूनही आधुनिकतेचा पुरावा देते. जंतर-मंतर भारताच्या ऐतिहासिक वारसास्थळांमध्ये सामील आहे.
वृत सम्राट यंत्र जंतर-मंतरच्या प्रवेशद्वारावरच निर्माण करण्यात आले आहे. या यंत्राद्वारे सूर्याची स्थिर स्थिती आणि स्थानिक वेळ निर्धारित केली जाते. सूर्याची किरणे या यंत्राच्या केंद्रस्थानी पडण्याच्या हिशेबानुसार वेळ निर्धारित होत असते. जुन्या काळात घड्याळाचे काम हेच यंत्र करायचे. वृत सम्राट यंत्र साधारण लोकांसाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. हे यंत्र पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात.
लघू सम्राट यंत्राला धूप घडी देखील म्हटले जाते. हे यंत्र सम्राट यंत्राचेच छोटे स्वरुप असल्याने याला सम्राट लघू यंत्र म्हटले जाते. लाल दगडाने तयार हे यंत्र स्थानिक वेळेचा शोध लावते. या यंत्राला खगोलशास्त्र आणि विज्ञानाचा अद्भूत नमुना म्हटले जाते. अशाप्रकारचे यंत्र जगभरात कुठेच नाही.
जंतर-मंतर जयपूरमध्ये भारतीय नागरिकांसाठी 50 रुपये प्रवेशशुल्क आहे. तर भारतीय विद्यार्थ्यांसाठी 15 रुपये प्रवेशशुल्क आकारण्यात येते. विदेशी पर्यटकांसाठी 200 रुपये तर विदेशी विद्यार्थ्यांसाठी 100 रुपये शुल्क घेण्यात येते. जयपूरच्या जंतर-मंतरला सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाहता येते. जंतर-मंतर येथील यंत्रांची वैशिष्ट्यो समजून घेण्यासाठी पर्यटकांना 1 तासाचा कालावधी लागत असतो.