Kolhapur News | माजी महापौर महादेवराव आडगुळे यांच्या १७ वर्षीय नातवाची गळफास घेऊन आत्महत्या
कोल्हापूर -सोन्या मारुती चौक परिसरात राहणारा कॉलेज युवक रौनक इंद्रजित आडगुळे (वय १७) याने आपल्या राहत्या घरात किचनमधील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ६ वाजता हा प्रकार उघडकीस आला. तेव्हा त्याला नातेवाईकांनी गळफास सोडवून बेशुध्दावस्थेत सीपीआरमध्ये दाखल केले.
मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. माजी महापौर आणि ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. महादेवरावआडगुळे यांचा नातू तर विकासक आणि सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत आडगुळे यांचा तो चिरंजीव होता. दुपारी रौनक याची अंत्ययात्रा काढली.रौनकच्या आत्महत्येने आडगुळे कुटुंबीयांसह त्यांच्या मित्र परिवाराला धक्का बसला आहे. रौनक हा सध्या बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. अभ्यासात हुशार, मनमिळाऊ आणि समंजस असलेला रौनक हा मित्र परिवार आणि सहकाऱ्यांच्या गळ्यातील ताईत होता.
नुकताच इंद्रजीत आडगुळे यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी रौनकच्या पुढाकारातून कुटुंबीयांनी एकत्र येऊन जल्लोष केला होता. मंगळवारी रात्री सर्वांनी एकत्र जेवणघेतले. त्यानंतर रौनक कुटुंबीयांशी गप्पा मारत होता. रात्री १२ वाजता कुटुंबीय झोपण्यासाठी गेले. सकाळी ६ च्या सुमारास महादेवराव आडगुळे हे पाणी पिण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरील स्वयंपाक घरात गेले. त्यावेळी त्यांना नातू रौनक आडगुळे याने स्वयंपाक घरातील फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. त्यांनी इंद्रजीत आडगुळे आणि कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. या घटनेने संपूर्ण कुटुंबीयांना धक्का बसला.