उल्कापिंडाच्या क्रेटरमध्ये वसलेले शहर
नॉर्डलिंगन शहर हे जर्मनीच्या बवेरियाच्या डोनौ-रीज जिल्ह्यात आहे. हे शहर अन्य कुठल्याही शहरापेक्षा खूपच वेगळे आहे. प्रत्यक्षात हे शहर उल्कापिंडाच्या क्रेटरमध्ये वसलेले आहे. याचमुळे याला पृथ्वीवरील सर्वात अनोखे शहर म्हटले जाऊ शकते. हे एक मध्ययुगीन शहर असून ते संरक्षित मध्ययुगीन भिंती, गॉथिक सेंट चर्च आणि राथौस टाउन हॉलसाठी ओळखले जाते.
नॉर्डलिंगन शहराची लोकसंख्या 20 हजारांहून अधिक आहे. हे शहर 25 किलोमीटर रुंद एका विशाल उल्कापिंडाच्या क्रेटरमध्ये वसलेले आहे. या क्रेटरला नॉर्डलिंगर रीज म्हटले जाते. जवळपास 14.5 दशलक्ष वर्षांपूर्वी या क्रेटरची निर्मिती झाली होती, जेव्हा एक मैल लांबीचा एक उल्का पृथ्वीला धडकली होती.
1960 मध्ये दोन अमेरिकन वैज्ञानिक यूजीन शूमेकर आणि एडवर्ड चाओ यांनी या शहरावरून अध्ययन केले आणि हे क्रेटर प्रत्यक्षात उल्कापिंडामुळे निर्माण झाल्याचे सिद्ध केले होते. नॉर्डलिंगन टाउनमध्ये एका चर्चची पाहणी करताना शूमेकर यांनी याच्या भिंती कशापासून तयार झाल्या आहेत हे पडताळून पाहिले होते. तेव्हा शॉक्ड क्वार्ट्जचा शोध त्यांनी लावला होता.
शॉक्ड क्वार्टज एकप्रकारचा खडक असतो, जो केवळ उल्कापिंडाच्या प्रभावाशी निगडित शॉक दबावामुळेच निर्माण होऊ शकतो. नॉर्डलिंगर रीजच्या अजब खडक संरचनांच्या शोधानंतर हा ख•ा उल्का प्रभावामुळे निर्माण झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. शॉक्ड क्वार्ट्जमध्ये सामान्य क्वार्ट्जच्या तुलनेत एक वेगळी सूक्ष्म संरचना असते.
आणखी एक इम्पॅक्ट क्रेटर
येथे आणखी एक इम्पॅक्ट क्रेटर असून त्याला स्टीनहेम क्रेटर म्हटले जाते. याचा व्यास सुमारे 3.8 किलोमीटर इतका आहे, जो नॉर्डलिंगर रीजच्या केंद्रापासून जवळपास 42 किलोमीटर अंतरावर आहे. हे दोन्ही क्रेटर एक द्विआधारी क्षूद्रग्रहाच्या प्रभावामुळे जवळपास एकाचवेळी निर्माण झाले आहेत. जेव्हा एखादी ठोस खगोलीय वस्तू अत्यंत वेगाने पृथ्वीच्या पृष्ठभागावर धडकते तेव्हा इम्पॅक्ट क्रेटर निर्माण होते.