मूल हे जामीनासाठी शस्त्र ठरु नये !
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बेंगळूर येथील तंत्रज्ञ अतुल सुभाष याने पत्नीने छळ केल्याचा आरोप करत केलेल्या आत्महत्या प्रकरणात दिल्लीच्या न्यायालयात सुनावणी होत आहे. सुभाष याची पत्नी आणि तिचे नातेवाईक यांना बेंगळूर पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. तर अतुल सुभाष याच्या कुटुंबियांनी दिल्लीच्या न्यायालयात एक याचिका सादर केली आहे. सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया यांना सुभाष यांच्यापासून एक पुत्र असून तो सिंघानिया यांच्या ताब्यात आहे. मात्र, निकिता सिंघानिया यांना मुलाचे कारण पुढे करुन जामीन देण्यास अटकाव करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
मुलाच्या सांभाळाचे कारण पुढे करुन निकिता सिंघानिया या जामीन मागण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांचा पुत्राचा उपयोग त्यांना जामीन मिळविण्यासाठी शस्त्र म्हणून करु दिला जाऊ नये, असा युक्तीवाद सुभाष यांच्या कुटुंबाचे वकील आकाश जिंदाल यांनी केला. निकिता सिंघानिया यांच्या जामीन अर्जात तिला मूल असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच मुलाचा सांभाळ योग्य प्रकारे करण्यासाठी निकिता सिंघानिया यांना जामीन मिळण्याची आवश्यकता आहे, असेही जामीन अर्जात स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि, मुलाचा उपयोग त्यांना जामीन मिळविण्यासाठी या प्रकरणात करु दिला जाऊ नये. तसे केल्यास तो सुभाष यांच्यावर मोठाच अन्याय ठरेल, असे आकाश जिंदाल यांचे म्हणणे आहे.
जामीनावर बेंगळूर येथे सुनावणी होणार
निकिता सिंघनिया आणि त्यांच्या कुटुंबियांनी जामीनासाठी बेंगळूर न्यायालयात अर्ज सादर केला आहे. त्यावर आणखी 3 जानेवारीला सुनावणी होणार आहे. या आत्महत्या प्रकरणातील आरोपी सिंघानिया कुटुंबाला बेंगळूरच्या न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. निकिता सिंघानिया यांच्यावर भारतीय न्याय संहिता अनुच्छेद 108 आणि अनुच्छेद 3 (5) अनुसार आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे.