बालकाने केले महत्वाचे संशोधन
हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. जो देश वैज्ञानिक आणि तंत्रवैज्ञानिक संशोधनात अग्रेसर असेल, त्याचाच जगावर प्रभाव असेल, अशी परिस्थिती आहे. जे देश या संशोधन क्षेत्रात मागे पडले आहेत, ते आर्थिकदृष्ट्या परावलंबी होत आहेत. इतके या संशोधनाचे महत्व आहे. वैज्ञानिक संशोधनाला काळ, वेळ, वय किंवा शिक्षण अशी कोणतीही बंधने नसतात. केवळ संशोधक आणि डोळस वृत्ती आवश्यक असते. एखाद्यात बालकात ही वृत्ती असेल तर तोही अल्पवयातच मोठा संशोधक होऊ शकतो. अमेरिकेतील नेब्रास्का प्रांतातील एक बालक सध्या अशा एका संशोधनामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्याचे नाव लिओ यंगडॉल असे आहे. केवळ 6 वर्षे वयाचा हा बालक बागेत खेळत असताना एका वस्तूने त्याचे लक्ष वेधून घेतले. वास्तविक ही वस्तू त्या बागेत येणाऱ्या अनेकांच्या दृष्टीस पडली असल्याची शक्यता आहे.
तथापि, या बालकाला ती वस्तू बागेतील अन्य वस्तूंच्या तुलनेत भिन्न वाटल्याने त्याने ती त्याने स्वत:जवळ ठेवली. ही वस्तू म्हणजे एक खडक होता. लिओ यंगडॉल याला तो चार वर्षांचा असल्यापासूनच जीवाश्मांचा संग्रह करण्याचा छंद आहे. त्यामुळे हा खडक हा साधा नसून तो एक जीवाश्म आहे, हे त्याने ओळखले आणि हा खडक त्याने प्रसिद्ध शिक्षणतज्ञ केली ईक्यू यांच्याकडे नेला. त्यांनी या खडकाचे परीक्षण केले तेव्हा त्यांना आनंदाश्चर्याचा धक्काच बसला. हा खडक एक जीवाश्मच होता आणि तो अत्यंत महत्वाचा होता. कारण तो ‘कोनुलारीड‘ नामक एका जीवाचा होता. हा जीव पृथ्वीवर डायनासोरच्याही आधी, अर्थात 20 ते 50 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. तो सध्याच्या जेलिफिशसारखा असून त्याचा आकार उलट्या पिरॅमिडसारखा होता. हा जीव अत्यंत मऊ असल्याने त्याचा जीवाश्म बनणे जवळजवळ अशक्य होते. तथापि, अशा जीवांच्या अत्यंत दुर्मिळ जीवाश्मांपैकी तो एक होता. तो हाती लागणे हे संशोधकांच्या दृष्टीने डायनासोर किंवा मॅमथ यांसारख्या कोट्यावधी वर्षांपूर्वीच नामशेष झालेल्या प्राण्यांच्या जीवाश्मांपेक्षाही महत्वाचे आहे. एका 6 वर्षांच्या बालकाच्या जिज्ञासू वृत्तीने एक दुर्मिळातील दुर्मिळ प्राचीन जीवसृष्टीतील एका जीवाचा हा महत्वाचा पुरावा संशोधकांच्या हाती लागला आहे. आज विज्ञान क्षेत्रात या बालकाने केलेल्या या ऐतिहासिक संशोधनाची मोठी प्रशंसा होत आहे.
