ओडिशात चार्टर विमानाला अपघात
दोन वैमानिकांसह सहा प्रवासी जखमी; भुवनेश्वर ते राउरकेला सेवेवेळी दुर्घटना
वृत्तसंस्था~ भुवनेश्वर
ओडिशात शनिवारी दुपारी भुवनेश्वरहून राउरकेला येथे उड्डाण करणारे इंडिया वन एअरचे नऊ आसनी विमान लँडिंग दरम्यान कोसळले. या अपघातात सहा जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. राउरकेला येथील रघुनाथपल्ली परिसरातील झुला ए ब्लॉकजवळ विमान कोसळले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब मानली जात आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
वृत्तानुसार, इंडिया वन एअरलाइन्सच्या विमानाने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास काटीबंधा कंसाराजवळील शेतात आपत्कालीन लँडिंग केले. चार प्रवासी आणि दोन वैमानिकांना घेऊन जाणाऱ्या सिंगल इंजिन विमानाने सुमारे चार ते पाच किलोमीटर उड्डाण केल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे वैमानिकाला क्रॅश लँडिंग करावे लागले. सुंदरगड जिह्यातील राउरकेला येथील कंसार येथे एक छोटे खासगी विमान कोसळल्यामुळे लोक आत अडकले.
सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल
या घटनेची माहिती मिळताच राउरकेला अग्निशमन दल आणि पानपोश अग्निशमन केंद्रातील अग्निशमन दलाच्या गाड्या जखमींना वाचवण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या. दुर्घटनेनंतर, जखमींना वाचवण्यात आले आणि उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. जखमींची नावे तूर्तास उघड करण्यात आली नव्हती.
अपघात कसा घडला?
भुवनेश्वर येथून उड्डाण केल्यानंतर चार्टर्ड विमान राउरकेला विमानतळावर उतरण्यापूर्वी सुमारे 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या जालदा परिसरात कोसळले. पायलटने आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न केला, परंतु विमान वेगाने खाली उतरले आणि क्रॅश झाले. सदर विमान राउरकेला येथे उतरणार होते. अपघाताचे फोटोही समोर आले आहेत. विमानाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून पंखही तुटले आहेत. विमानाचा नोंदणी क्रमांक व्हीटी-केएसएस असा आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही.