For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तामिळनाडूच्या भूमीत परिवर्तनाची चाहुल : मोदी

06:16 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
तामिळनाडूच्या भूमीत परिवर्तनाची चाहुल   मोदी
Advertisement

द्रमुक अन् काँग्रेसच्या आघाडीचा अहंकार मोडला जाणार : तामिळनाडूत भाजप मिळविणार मोठे यश

Advertisement

वृत्तसंस्था/ कन्याकुमारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी तामिळनाडूच्या कन्याकुमारीत जाहीरसभेला संबोधित केले आहे. आज कन्याकुमारीतू देशाच्या या दक्षिण टोकावरून निर्माण झालेली ही लाट अत्यंत दूरपर्यंत जाणार आहे. मी 1991 मध्ये एकता यात्रेकरता कन्याकुमारीतून काश्मीरपर्यंत गेलो होतो. यावेळी काश्मीरमधून कन्याकुमारीत आलो आहे. जम्मू-काश्मीरच्या लोकांनी देश तोडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना नाकारले आहे. आता तामिळनाडूचे लोक देखील याचीच पुनरावृत्ती करणार आहेत. तामिळनाडूच्या भूमीवर अत्यंत मोठ्या परिवर्तनाची चाहूल मी अनुभवत आहे. तामिळनाडूत भाजपची कामगिरी यावेळी द्रमुक आणि काँग्रेसच्या आघाडीचा अहंकार मोडीत काढणार असल्याचे वक्तव्य मोदींनी केले आहे.

Advertisement

पंतप्रधान मोदींचा 17 दिवसांमध्ये तामिळनाडूचा हा दुसरा दौरा आहे. यापूर्वी 28 फेब्रुवारी रोजी मोदींनी थूथुकुडीमध्ये 17 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन केले होते. यात देशातील पहिला हायड्रोजन हब पोर्ट अणि इनलँड वॉटर वे वेसल तसेच कुलाशेखरपट्टणममध्ये इस्रोचे नवे लाँच कॉम्प्लेक्स देखील सामील आहे.

इंडी आघाडीचा घोटाळ्यांचा इतिहास

इंडी अलायन्स कधीही तामिळनाडूला विकसित करू शकत नाही. या लोकांचा इतिहास घोटाळ्यांचा आहे. या लोकांच्या राजकारणाचा आधार लोकांना लुटण्यासाठी सत्तेवर येण्याचा आहे. एकीकडे भाजपच्या कल्याणकारी योजना असतात तर दुसरीकडे इंडी आघाडीचे कोट्यावधींचे घोटाळे असतात. आमच्या सरकारने ऑप्टिकल फायबर, 5जी, डिजिटल इंडिया योजना दिली. तर इंडी आघाडीच्या नावावर लाखो कोट्यावधी रुपयांचा 2जी घोटाळा आहे आणि द्रमुक या लुटीतील सर्वात मोठा हिस्सेदार होता. आमच्या नावावर उडान योजना आहे, तर इंडी आघाडीच्या नावावर हेलिकॉप्टर घोटाळा आहे. आमच्या खेलो इंडिया आणि टीओपीएस योजनेद्वारे देशाने क्रीडाक्षेत्रात नेत्रदीपक यश मिळविले. तर इंडी आघाडीच्या नावावर राष्ट्रकुल घोटाळ्याचा कलंक असल्याचा हल्लाबोल मोदींनी चढविला आहे.

अटलबिहारी वाजपेयींचा उल्लेख

कन्याकुमारीने नेहमीच भाजपला भरपूर प्रेम दिले आहे. 20 वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांनी नॉर्थ-साउथ कॉरिडॉरचा पाया रचला होता. या कॉरिडॉरच्या कन्याकुमारी-नारिक्कुलम ब्रिजचे काम द्रमुक आणि काँग्रेसने अनेक वर्षांपर्यंत लटकवून ठेवले. 2014 मध्ये आमचे सरकार आल्यावर आम्ही हे काम पूर्ण केले. आम्ही याकरता अतिरिक्त निधी दिल्यावर हे काम सुरू झाले होते. आमच्या सरकारने मच्छिमारांच्या कल्याणासाठी त्यांना किसान व्रेडिट कार्डच्या कक्षेत आणले, असा दावा मोदींनी केला आहे.

द्रमुक तामिळनाडूच्या इतिहासाचा शत्रू

द्रमुक हा तामिळनाडूचे भविष्य आणि भूतकाळाचाच नव्हे तर त्याच्या वारशाचा देखील शत्रू आहे. अयोध्येत राममंदिर प्राणप्रतिष्ठेपूर्वी येथे मी आलो होतो, तेव्हा येथील प्राचीन तीर्थस्थळांचे दर्शन घेतले होते. परंतु द्रमुकने अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. सर्वोच्च न्यायालयाला तामिळनाडू सरकारला याप्रकरणी कठोर शब्दांत फटकारावे लागले होते.  दिल्लीत संसदेची नवी वास्तू उभी राहिल्यावर तमिळ संस्कृतीचे प्रतीक, या भूमीचा आशीर्वाद स्वरुप पवित्र सेंगोल आम्ही नव्या भवनात स्थापित केला. तेव्हा द्रमुक आणि काँग्रेसने बहिष्कार घातला होता. जल्लीकट्टूवर बंदी घालण्यात आल्यावर द्रमुक आणि काँग्रेसने मौन बाळगले होते. द्रमुक आणि काँग्रेस तमिळ संस्कृती नष्ट करू पाहत आहेत. परंतु रालोआ सरकारने जल्लीकट्टू साजरा करण्याचा मार्ग मोकळा केल्याचे मोदी म्हणाले.

मच्छिमारांचा जीव वाचविला

इंडी आघाडी ही तामिळनाडूच्या लोकांच्या आयुष्याशी खेळत आहे. श्रीलंकेत आमच्या मच्छिमार बांधवांना मृत्युदंड ठोठावण्यात आला होता. तेव्हा आम्ही सर्व मार्ग अवलंबिले, दबाव आणला आणि सर्व मच्छिमारांचा जीव वाचविला असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.

Advertisement
Tags :

.