For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगभरातील लोकशाहीपुढे आव्हान

06:54 AM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
जगभरातील लोकशाहीपुढे आव्हान
Advertisement

जगाच्या राजकारणात सध्या एकाच वेळी दोन परस्परविरोधी प्रवाह दिसत आहेत. एका बाजूला उजव्या विचारसरणीचा वाढता प्रभाव, राष्ट्रवादाचा राजकीय वापर आणि सत्तेचे केंद्रीकरण सुरू आहे; तर दुसऱ्या बाजूला प्रस्थापित सत्तेला आव्हान देणारी जनआंदोलने, बदलाची अपेक्षा करणारे मतदार आणि लोकशाही संस्थांच्या स्वायत्ततेसाठी रस्त्यावर उतरणारे नागरिकही आहेत. ब्राझीलमध्ये लुईझ इनाशिओ लुला दा सिल्वा यांचा विजय आणि सर्बियामध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने मिळवलेले यश या दुसऱ्या प्रवाहाचे ठळक निदर्शक आहेत.

Advertisement

याघटनांकडे केवळ दोन देशांतील निवडणुकांचे निकाल म्हणून पाहणे पुरेसे ठरणार नाही. त्या जगभरातील लोकशाहीच्या वर्तमानाचे आणि भविष्याचे संकेत देतात. ब्राझीलमध्ये 25 ऑक्टोबरला झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत लुला यांनी 51.79 टक्के मते मिळवून उजव्या विचारसरणीचे उमेदवार फ्लाव्हिओ बोल्सोनारो यांचा पराभव केला. त्यांना 48.21 टक्के मते मिळाली. लुला यांचा हा चौथा अध्यक्षीय कार्यकाळ असेल. दक्षिण अमेरिकेतील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेने दिलेला हा कौल महत्त्वाचा आहे. कारण या खंडात अलीकडच्या काळात उजव्या विचारसरणीच्या राजकारणाला बळ मिळत असताना लुला यांनी आपली राजकीय पकड पुन्हा सिद्ध केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांशी वैचारिक संघर्ष असलेल्या लुला यांच्या विजयामुळे वॉशिंग्टनच्या प्रभावाला अनुकूल असलेल्या राजकीय समीकरणांनाही आव्हान मिळाले आहे. मात्र, या निकालाचा अर्थ संपूर्ण दक्षिण अमेरिका पुन्हा डावीकडे वळली, असा लावणे घाईचे ठरेल. प्रत्येक देशातील आर्थिक परिस्थिती, स्थानिक नेतृत्व आणि मतदारांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. या विजयाचे आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे पराभूत उमेदवाराने निकाल स्वीकारण्यास नकार दिला आहे. पराभव मान्य न करणे आणि संस्थांच्या निर्णयावर राजकीय संशय निर्माण करणे यांत फरक आहे. लोकशाहीत निवडणूक जिंकण्याइतकाच महत्त्वाचा गुण म्हणजे पराभव स्वीकारण्याची तयारी. सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर व्हूचिच यांच्या दीर्घ राजकीय वर्चस्वाला विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आव्हान दिले. 2024 मध्ये नोवी साद येथील रेल्वे स्थानकाचे छत कोसळून 16 जणांचा मृत्यू झाल्यानंतर या आंदोलनाला सुरुवात झाली. भ्रष्टाचाराला जबाबदार धरणे, प्रशासनात पारदर्शकता आणणे आणि सत्तेच्या केंद्रीकरणाला विरोध करणे या मागण्यांभोवती विद्यार्थ्यांनी जनसमर्थन उभे केले. दोन वर्षांच्या शांततापूर्ण आंदोलनानंतर झालेल्या निवडणुकीत विद्यार्थीसमर्थित उमेदवारांच्या यादीने संसदेतील बहुमत मिळवले. या विजयामुळे सर्बियात परिवर्तनाची शक्यता निर्माण झाली, तरी सरकार चालविण्याचा अनुभव नसलेल्या नव्या नेतृत्वासमोर मोठी आव्हाने आहेत. जनतेचा असंतोष सत्तांतर घडवू शकतो; पण लोकांचा विश्वास टिकविण्यासाठी सक्षम प्रशासनाची जोड आवश्यक असते. झेक प्रजासत्ताकात सार्वजनिक दूरचित्रवाणी आणि नभोवाणीच्या निधीव्यवस्थेत बदल करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाविरोधात नागरिक प्रागमध्ये रस्त्यावर उतरले. नागरिकांकडून मिळणाऱ्या शुल्काऐवजी सरकारी अर्थसंकल्पातून निधी देण्याच्या प्रस्तावामुळे माध्यमांच्या स्वायत्ततेवर राजकीय दबाव येऊ शकतो, अशी आंदोलकांची भीती आहे. सरकारने निधीच्या नव्या पद्धतीचे समर्थन केले असले, तरी सार्वजनिक प्रसारमाध्यमांना आर्थिकदृष्ट्या सत्ताधाऱ्यांवर अवलंबून ठेवण्याचे परिणाम गंभीर असू शकतात. माध्यमस्वातंत्र्य हे केवळ पत्रकारांचे हित नसून नागरिकांच्या माहिती मिळविण्याच्या अधिकाराचा भाग आहे. सत्तेवर प्रश्न विचारण्याची क्षमता माध्यमांनी गमावली, तर लोकशाहीतील उत्तरदायित्वाची एक महत्त्वाची यंत्रणा कमकुवत होते. अमेरिकेतील ओहायोच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत विवेक रामस्वामी यांच्या प्रचाराने आणखी एका समस्येकडे लक्ष वेधले आहे. प्रतिस्पर्धी एमी अॅक्टन यांच्या परक्या झालेल्या आईचा वापर करून त्यांच्यावर वैयक्तिक आरोप करणाऱ्या जाहिरातीवरून वाद निर्माण झाला. अॅक्टन यांच्या बालपणीच्या अत्याचाराच्या दाव्यांना न्यायालयीन कागदपत्रे आणि तत्कालीन वृत्तांकनातील काही बाबींचा आधार असल्याचे काही माध्यमांनी नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर वैयक्तिक वेदना आणि कौटुंबिक आघातांचा मतांसाठी वापर करणे हे प्रचारातील नैतिकतेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करते. निवडणुकीतील स्पर्धा धोरणांवर असावी की प्रतिस्पर्ध्याच्या खासगी आयुष्याचे राजकीय शस्त्र बनविण्यावर, हा प्रश्न केवळ अमेरिकेपुरता मर्यादित नाही. इस्रायलमध्ये 27 ऑक्टोबरला सुरू असलेले मतदानही युद्ध, राष्ट्रीय सुरक्षा आणि नेतृत्वावरील विश्वास यांची कसोटी ठरत आहे. हमासच्या 7 ऑक्टोबर 2023च्या हल्ल्यानंतर प्रथमच होणाऱ्या या राष्ट्रीय निवडणुकीत पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे राजकीय भवितव्य पणाला आहे. युद्धकाळातील नेतृत्वाचे मूल्यमापन करताना सुरक्षा, शांततेची शक्यता, आंतरराष्ट्रीय संबंध व लोकशाही संस्थांची स्थिती यांचा विचार मतदारांना करावा लागेल. या साऱ्या घटनांचा समान धागा स्पष्ट आहे. जनतेला केवळ प्रभावी भाषणे किंवा वैचारिक घोषणा नको आहेत; तिला उत्तरदायी सत्ता, पारदर्शक व्यवस्था आणि स्वत:च्या मताचा आदर हवा आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.